Maratha Kranti Morcha: मावळात ‘चक्का जाम’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या औद्योगिक क्षेत्रातील बहुतांशी कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती.

वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या औद्योगिक क्षेत्रातील बहुतांशी कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती.

पुणे-मुंबई महामार्ग तसेच द्रुतगती मार्गावर शुकशुकाट दिसून आला. लोकल सेवा मात्र सुरळीत चालू होती. लोणावळ्यात रेल रोको आंदोलन तर द्रुतगती मार्ग, पुणे-मुंबई महामार्ग व तळेगाव-चाकण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. 

वडगावात वारकऱ्यांचा सहभाग
मावळ तालुका मराठी क्रांती मोर्चाने हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार केला होता. समाजातील सर्व घटकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही केले होते. त्याला प्रतिसाद देऊन येथील सर्व व्यापाऱ्यांनी व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, इतर शासकीय कार्यालये, बॅंका आदींचे कामकाज ठप्प झाले होते. रिक्षा संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. गुरुवारचा आठवडा बाजार रद्द केला. कान्हे, नायगाव, साते, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, अहिरवडे, जांभूळ या गावातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदर मावळसह कान्हे, कामशेत, नायगाव, साते, जांभूळ आदी गावातील कार्यकर्त्यांनी कान्हे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यात वारकरी संप्रदायाने रस्त्यावर ठिय्या मांडला होता. भजन, भारुड सादर करुन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. सुमारे चार तास हे आंदोलन झाले. वडगावचे पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हॉटेल, ढाबे बंद ठेवण्यात आले. एसटी तसेच पीएमपीएलची सेवाही बंद ठेवण्यात आली होती. लांबपल्ल्याची माल वाहतूक करणाऱ्या चालकांनी आपली वाहने हॉटेल, पेट्रोलपंपावर पार्क करुन विश्रांती घेणेच पसंत केले.

लोणावळ्यात ‘रेल रोको’
लोणावळा - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत लोणावळा, खंडाळा, कार्ला, कुसगाव बु. परिसरात क्रांतिदिनी (ता. ९) कडकडीत बंद पाळण्यात आला. बंददरम्यान मराठा समाजाच्या वतीने लोणावळा स्थानकात कोइमतूर-कुर्ला एक्‍स्प्रेस रोखली. याचबरोबर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी भर चौकात सामुदायिक मुंडण, भजन तसेच चूल व जेवणावळ मांडत मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. गुरुवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते एकत्र आले. महिलांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मराठा समाजातील चार ते पाच हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. बंददरम्यान सर्व दुकाने व्यवसाय, शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद ठेवण्यात आली. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक रोडावल्याने द्रुतगती मार्ग ओस पडला होता.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस दल, रेल्वे पोलिस बलाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोणावळ्यासह काही भागात मोबाईलची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

तळेगावात चार तास ठिय्या
तळेगाव स्टेशन - तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी साडेनऊपासून तळेगाव-चाकण महामार्गावरील मराठा क्रांती चौकात जमा होऊन ठिय्या मांडून बसले. आंदोलनकर्त्यांनी आमदार कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. आमदार बाळा भेगडे हेही आंदोलनात घोषणा देत होते. दरम्यान झालेल्या भाषणांमध्ये आजचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दबाव आणल्याचा आरोप काहींनी केला, तर तीन वर्षे नुसता अभ्यास करणारे सरकार मराठा आंदोलनाबाबत नापास झाल्याची खिल्लीही उडवण्यात आली.

तळेगाव आंदोलनातील ठकक मुद्दे
- तळेगाव-चाकण महामार्गावर ठिय्या आंदोलन झालेल्या चौकाला मराठा क्रांती चौक असे नामकरण.
- हनुमान दहीहंडी उत्सव समितीची यंदाची हंडी रद्द करून मराठा हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मदत करणार.
- भर पावसातही कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या.
- ठिय्या आंदोलनात आमदार बाळा भेगडे यांचा सहभाग.

देहूरोड परिसरात शांतता
देहू - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला देहूरोड आणि देहू परिसरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी देहूरोड बाजारपेठेतून मोर्चा काढला. तसेच पुणे मुंबई महामार्गावर सेंट्रल चौकात रास्ता रोको केले. देहू गावात सकल मराठा समाजाच्या वतीने गावातून मोर्चा काढून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको करण्यात आला. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. देहूरोडला सुमारे तासभर आंदोलन सुरू होते. वाल्मीकी समाज, साउथ इंडियन असोसिएशन, शीख समाजाने आंदोलनाला पाठिंबा दिला. तलाठी अतुल गिते यांनी निवेदन स्वीकारले. ॲड. कैलास पानसरे, कृष्णा दाभोळे, रमेश जाधव, विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे उपस्थित होते.

देहूत शांततेत मोर्चा
देहूच्या प्रवेशद्वाराजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. यापूर्वी गावातून मोर्चा काढण्यात आला. सरपंच उषा चव्हाण, हेमा मोरे, स्वप्नील काळोखे, सुनील हगवणे, बाळासाहेब काळोखे मोर्चात सहभागी झाले होते. 

उर्से टोलनाक्‍याजवळ सहा तास ‘रास्ता रोको’
सोमाटणे - टाळमृदंगाच्या निनादात मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाका येथे सहा तास शांततेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळी साडेनऊ वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे आंदोलन सुरू झाले. मराठा मावळी वारकऱ्यांनी अभंग, गवळणी, ओव्या म्हणत टाळ मृदंग, पखवाजाच्या निनादात रस्ता रोको आंदोलन केले. दुपारी बाराच्या सुमारास उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, परंदवडी, सोमाटणे, बेबडओहोळ, शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, आढले, चांदखेड, शिवणे, वडगाव, तळेगाव, देहूरोड, शेलारवाडीतील शेकडो तरुण आंदोलनात सहभागी होण्यासाठी टोलनाक्‍याजवळ आले. सहा तास शांततेत आंदोलन केले. दोन हजार तरुण सहभागी झाले होते. 

महामार्गावर खासगी वाहनचालकांनी येण्याचे टाळल्याने वाहतुकीची कोंडी टळली. पोलिसांनी द्रुतगतीवरील वाहने टोल नाक्‍यापासून दोन्ही बाजूस एक किलोमीटरवर अडविल्याने दिवसभरात एकही वाहन  टोलनाक्‍यावर आले नाही. दोन्ही बाजूंना वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. चुकून प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना द्रुतगतीवर सहा तास थांबावे लागले. केंद्रीय राखीव पोलिस, विशेष आर्मी फोर्स, महामार्ग व इतर पोलिस पथके तैनात होती. 

कामशेत बाजारपेठ बंद
गजबजलेली बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. पेट्रोल पंप, हॉटेल, उपाहारगृहे बंद होती. औषधांची दुकाने व दवाखाने चालू होते. शाळा, महाविद्यालये तसेच बॅंका, सरकारी कार्यालये बंद होती. रिक्षा, सहा आसनी रिक्षा, जीप, एसटी तसेच खासगी वाहतूकही बंद होती. 

इंदोरीतील सर्व व्यवहार ठप्प
इंदोरी - इंदोरी शहर व परिसरातील गावांमध्ये उत्स्फूर्तपणे कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. इंदोरी, सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे, नाणोली, वराळे, माळवाडी, कोटेश्वरवाडी, कान्हेवाडी, सांगुर्डी या गावांतील दुकानदार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनी दिवसभर व्यवहार बंद ठेवले होते. तसेच रिक्षा, एसटी, पीएमपी यांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व सेवा बंद असल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. फक्त दवाखाने, औषधाची दुकाने, बॅंका, ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनीचे कार्यालय सुरू होते. जि. प. प्राथमिक शाळा, प्रगती माध्यमिक विद्यालय, सरस्वती विद्यामंदिर तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळाही बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली होती. चाकण-तळेगाव रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. ट्रक व अवजड वाहने अजिबात रस्त्यावर नव्हती. युवकांनी दुचाकी रॅली काढली. भगवे झेंडे हातात घेऊन निघालेल्या या रॅलीतील तरुणांनी घोषणा दिल्या. तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनने दक्षता म्हणून दिवसभर गावागावांत पोलिसांची गस्त सुरू ठेवली होती. ‘बंद’ शांततेत पार पडला.

१८ वर्षांतील मोठे आंदोलन
बेबडओहोळ - आंदोलकांनी दिवसभरासाठी द्रुतगती महामार्ग बंद केल्याने, मावळ तालुक्‍यातील अठरा वर्षांतील हे सर्वांत मोठे आंदोलन ठरले. राजकीय नेते तसेच पोलिसांनी आवाहन करूनही आंदोलन सुरूच राहिले. 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सकाळपासूनच बंद केली गेली. अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ द्रुतगती महामार्ग बंद करण्याची परवानगी नसताना, आंदोलकांनी दिवसभर वाहतूक रोखून धरली. राजकीय क्षेत्रातील अनेकांनी आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न केले. पण सर्व ते व्यर्थ ठरले. पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनीदेखील आंदोलन बंद करण्याची विनंती केली. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत महामार्गावरून न हलण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

पवन मावळात मोठा प्रतिसाद
पवन मावळात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. द्रुतगती महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक बंद होती. आढे गावात आंदोलनात लहान मुलांनीही सहभाग घेतला. पवन मावळातील गावागावात ग्रामस्थांनी दुकाने व आपली दैनंदिन कामे बंद ठेवत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दूध व्यवसाय करणाऱ्या व रोजचे दूध विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागला. शाळांना सुटी देण्यात आली. बेबडओहोळ, ऊर्से औद्योगिक परिसरातील सर्व कंपन्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सकाळपासूनच बंद होती. पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त तैनात केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh