
पुणे - मराठा आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत पुणेकरांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. शहर व उपनगरांतील शाळा, महाविद्यालये बंद होती. सोन्या-चांदीच्या दुकानांसह कापड व्यावसायिक, तसेच घाऊक व किरकोळ दुकानदारांनीही उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे एरवी गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. मोकळ्या रस्त्यांवर नागरिकांचीही वर्दळ नव्हती. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.
पुणे - मराठा आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत पुणेकरांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. शहर व उपनगरांतील शाळा, महाविद्यालये बंद होती. सोन्या-चांदीच्या दुकानांसह कापड व्यावसायिक, तसेच घाऊक व किरकोळ दुकानदारांनीही उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे एरवी गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. मोकळ्या रस्त्यांवर नागरिकांचीही वर्दळ नव्हती. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.
महात्मा फुले मंडईसमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौक नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनांमुळे चर्चेत असतो; परंतु गुरुवारी मात्र तेथे सकाळपासूनच नीरव शांतता होती. लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढ्या, कुमठेकर रस्त्यावरील कापड व्यावसायिकांनीदेखील स्वतःहून दुकाने बंद ठेवली होती. तुळशीबागेतील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनीसुद्धा पत्रक काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. बंदमुळे तुळशीबागेत मुले क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होती.
काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवणे पसंत केले. बाहेर पडण्याऐवजी घरातच बसून राहावे, असे एसएमएस व्हॉट्सॲपद्वारे नागरिकांमार्फत कुटुंबीयांसह नातेवाइकांना पाठविण्यात येत होते.
सकाळपासूनच शहरातील पेठांमध्ये हजारो कार्यकर्ते ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत रस्त्यांवर उतरले होते. बाईक रॅली काढणाऱ्या तरुणांनी स्वारगेट येथील केशवराव जेधे चौक, टिळक रस्त्यावरील एन. एम. पूरम चौक, शंकरशेठ रस्त्यावर सेव्हन लव्हज् चौकात ठिय्या आंदोलन केले. लक्ष्मी रस्त्यावर उंबऱ्या गणपती चौकात एका बसच्या काचा जमावाने फोडल्या. सोमवार पेठेत सारस्वत बॅंकेचे शटर बंद करण्यास आंदोलनकर्त्यांनी भाग पाडले. सीताराम थोपटे भाजी मंडईत आंदोलनकर्त्यांनी राडा केला. भाजीचे स्टॉल्स उधळून लावले. यापलीकडे पेठांमध्ये काही अनुचित प्रकार घडला नाही. एसटीची सेवा बंद ठेवल्याने शिवाजीनगर, स्वारगेट बस स्थानकावर प्रवासी खोळंबून राहिले. पीएमपी, रिक्षा, कॅबची तुरळक वाहतूक सकाळी सुरू होती; परंतु आंदोलनकर्त्यांनी काही ठिकाणी दगडफेक केल्याने वाहतूक सेवा दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.
शहरातील सर्व पेठा, तसेच उपनगरांतही पोलिस बंदोबस्त चोख होता. औंध, बाणेर, पाषाण, बालेवाडी, बोपोडी, चतु:शृंगी, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर या भागांतही शांतता होती.
दिवसभरातील आंदोलनाचे पडसाद
प्रमुख चौकांसह रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त
भगवे झेंडे, उपरणे, फेटे घालून दुचाकीवरून रॅली
पेट्रोल पंप, सिनेमागृह, मॉल, शाळा, महाविद्यालये, बॅंका पूर्णत: बंद
एसटी व पीएमपी बस स्थानकांमध्ये शांतता
पुरुष, महिलांसह युवक, युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांवर शुकशुकाट
काही ठिकाणी दगडफेक, तोडफोडीच्या घटना
जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप