पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेतलेच पाहिजेत. या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, तर खासदार वंदना चव्हाण यांच्या घरासमोर गुरुवारी घंटानाद करत ठिय्या आंदोलन केले.

‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आमदार-खासदार जागे व्हा, जागे व्हा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, घेतल्याशिवाय राहणार नाही,’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी बापट यांना मागण्यांचे निवेदन दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन कायद्यातील सर्व बाबींची पूर्तता करून तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाईल, असे आश्वासन बापट यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहनही बापट यांनी केले
मोर्चाचे समन्वयक विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, बाळासाहेब अमराळे, सुनीता मोरे, रवींद्र माळवदकर, कमल व्यवहारे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजातील तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. मराठा समाजासह धनगर व मुस्लिम समाजालादेखील सरकार न्याय देईल, असेही बापट यांनी सांगितले.
पासलकर म्हणाले, ‘‘आमदार-खासदारांना समाज निवडून देतो. लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न विधानसभेत आणि लोकसभेत मांडायचे असतात. जनतेच्या भावनांची जपवणूक त्यांनी करायची असते. ५८ मोर्चानंतरही सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्यानेच मोर्चाचा उद्रेक होत आहे. लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी.’’
कोंढरे, काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. खासदार ॲड. वंदना चव्हाण यांचे पती हेमंत चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. राज्यमंत्री कांबळे यांच्या लष्कर परिसरातील कार्यालयातही आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.