
जुन्नर - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १) सरकार विरुद्ध असहकार आंदोलन पुकारले होते. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले, तर व्यावसायिकांनी कडकडीत ‘बंद’ पाळून आंदोलनास पाठिंबा दिला. रस्त्यावर शुकशुकाट होता. एसटी बस स्थानके ओस पडली होती. प्रशासनाने तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज शाळांना सुटी देण्यात आली होती.
जुन्नर - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १) सरकार विरुद्ध असहकार आंदोलन पुकारले होते. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले, तर व्यावसायिकांनी कडकडीत ‘बंद’ पाळून आंदोलनास पाठिंबा दिला. रस्त्यावर शुकशुकाट होता. एसटी बस स्थानके ओस पडली होती. प्रशासनाने तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज शाळांना सुटी देण्यात आली होती.
आज सकाळी तालुक्याच्या विविध गावांतून मराठा समाज बांधव मोटारसायकल रॅलीने ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत भगवे झेंडे घेऊन जुन्नरला आले. शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला. यात महिला, युवक, व्यावसायिक, शेतकरी, नोकरदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पाच हजारांहून अधिक समाज बांधव आरक्षणाची मागणी करत मोर्चात सहभागी झाले होते. आमदार शरद सोनवणे, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, युवक नेते अतुल बेनके, शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके आदी या मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनास विविध संस्था व व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला होता.
जुन्नर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलकांनी ठिय्या मांडला. या वेळी ऋषिकेश काळे, सायली दुराफे, प्रीतम ढमाले या विद्यार्थ्यांची आरक्षणाच्या विषयावर भाषणे झाली. आरक्षणाच्या प्रश्नासाठी बलिदान केलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मढ येथील रस्ता रोको आंदोलनप्रकरणी युवकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मोर्चाच्या वतीने या वेळी मागणी करण्यात आली. ती प्रशासनाने मान्य केली.
तहसीलदार किरण काकडे यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. मराठा समाजाच्या भावना वरिष्ठांना कळविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मराठा मोर्चाचे जिल्हा समन्वयक रमेश हांडे व मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील ढोबळे यांनी संयोजन केले. पोलिस निरीक्षक सुरेश बोडखे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनाचा घटनाक्रम...
सकाळी १० वाजता - जुन्नर शहर व परिसरातील गावांमधून मराठा समाज बांधवांचे भगवे झेंडे घेत, घोषणा देत शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर गटागटाने जमा होण्यास सुरवात. हळूहळू गर्दी वाढू लागली.
सकाळी १०.३० - ओतूर- मढ व परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने रॅलीने छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यासमोर दाखल झाले.
सकाळी ११.३० - आळेफाटा, नारायणगाव व पंचक्रोशीतील मराठा कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने मोटारसायकल रॅलीने शिवजन्मभूमीमध्ये दाखल.
सकाळी ११.४५ - आयोजकांकडून आंदोलनाची दिशा, मोर्चाचा मार्ग, शिस्त व शांततेबाबत मोर्चेकऱ्यांना माहिती दिली.
सकाळी ११.५५ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण अर्पण करून, अभिवादन करून मोर्चास सुरवात झाली.
दुपारी १२.१० - मोर्चा विविध घोषणा देत शांततेच्या मार्गाने जुन्नर बस स्थानकावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आला.
दुपारी १२.२५ - धान्यबाजार- नेहरू बाजारपेठ मार्गे आंदोलक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाजवळ दाखल.
दुपारी १२.३० - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
दुपारी १२.३५ - हजारोंच्या संख्येने मोर्चा जुन्नर तहसील कार्यालयावर धडकला.
दुपारी १२.५० - आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरक्षण व सरकारविरोधी निषेधपर मनोगते.
दुपारी १.२० - आंदोलनादरम्यान मढ येथे काही आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असल्याने प्रशासनाने ते तातडीने मागे घ्यावे, यासाठी समाजबांधव संतप्त.
दुपारी १.४५ - परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार किरण काकडे यांनी जमावास शांततेचे आवाहन करत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात.
दुपारी १.५० - राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली.