पेणच्या गणेश मूर्तिकारांना बसला इतक्या कोटींचा फटका; परदेशवारीत घट

प्रदीप मोकल
Thursday, 20 August 2020

कोरोना व लॉकडाऊनमुळे यावर्षी पेण तालुक्‍यातील गणेश मूर्तीकारांना सुमारे 25 कोटींचा फटका बसला आहे. दरवर्षी पेण तालुक्‍यातून सुमारे 80 ते 90 कोटी रुपयांच्या गणेशमूर्ती संपूर्ण देशासह विदेशातही पाठवण्यात येतात. परंतु, या वर्षी मात्र सुमारे 50 ते 60 कोटींचा व्यवसाय झाल्याने गणेश उद्योगाला 20 ते 25 कोटींचा फटका बसला आहे. 

वडखळ : कोरोना व लॉकडाऊनमुळे यावर्षी पेण तालुक्‍यातील गणेश मूर्तीकारांना सुमारे 25 कोटींचा फटका बसला आहे. दरवर्षी पेण तालुक्‍यातून सुमारे 80 ते 90 कोटी रुपयांच्या गणेशमूर्ती संपूर्ण देशासह विदेशातही पाठवण्यात येतात. परंतु, या वर्षी मात्र सुमारे 50 ते 60 कोटींचा व्यवसाय झाल्याने गणेश उद्योगाला 20 ते 25 कोटींचा फटका बसला आहे. 

दरवर्षी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधील व्यापारी पेण तालुक्‍यातील जोहे, कळवे, तांबडशेत, हमरापूर, शिर्की, उंबर्डे व पेण शहरामधून होलसेलमध्ये गणेशमूर्ती नेऊन त्यांची विक्री करत असतात. परंतु, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी रेड झोन असल्याने व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात गणेशमूर्तींची खरेदी केली. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, संभाजीनगर यांसह इतर शहरांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तेथे मंडप टाकून गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी परवानगी नसल्याने गणेशमूर्ती विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे, अशी माहिती गणेश मूर्तीकार संघटना अध्यक्ष कुणाला पाटील यांनी दिली आहे. 

वाचा हेही : कोरोनाने मोडलं कंबरडं, धारावीतील चमडा बाजार दहा वर्षे मागे

निर्यात न झाल्याने कोट्यवधींचा फटका 
दरवर्षी पेण तालुक्‍यातून लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशससह अनेक देशांना बाप्पाची वारी होते. पेण तालुक्‍यातून दरवर्षी सुमारे 1 लाखांहून अधिक गणेशमूर्ती परदेशात जातात. लंडन, ऑस्ट्रेलियन, थिवी व अमेरिका येथे बाप्पाची मूर्ती कंटेनरमधून समुद्रमार्ग जहाजाने पाठवण्यात येतात. या प्रवासाला 45 ते 50 दिवस लागतात; परंतु यावर्षी बाप्पाची वारी होऊ शकली नाही. यावर्षी सुमारे 20 हजार गणेशमूर्तींचीच वारी परदेशात झाली आहे. परंतु सुमारे 70 ते 80 हजार गणेशमूर्तींची निर्यात न झाल्याने या व्यवसायाला दीड ते दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 

मोठी बातमी : सीबीआयच्या पथकाला क्वारंटाईनमध्ून सूट मिळण्याची शक्यता? वाचा सविस्तर 

50 हजार मूर्तींची कोकणवारी नाही 
मुंबईतील चाकरमानी कोकणात जाताना पेण येथून सुबक सुंदर बाप्पांची मूर्ती रेल्वेद्वारे घेऊन जातात. यावर्षी रेल्वे बंद असल्याने आणि गणेशभक्तांना 10 दिवस क्वारंटाईनचे आदेश असल्याने हजारो गणेशभक्तांनी कोकणवारी न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, सुमारे 50 हजार गणेशमूर्ती कोकणात गेल्याच नाहीत. खासगी गाडीने गणेशमूर्ती कोकणात घेऊन जाणे परवडत नसल्याने गणेशमूर्ती विक्रीवर परिणाम झाला आहे, अशी माहिती गणेश मूर्तीकार संघटनेचे खजिनदार नारायण म्हात्रे यांनी दिली आहे. 

हेही वाचा : कोरोनाग्रस्त पित्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच मुलानेही सोडला प्राण; नवीन पनवेलमधील घटनेने हळहळ

पीओपीच्या 3 लाख गणेशमूर्ती विक्रीविना 
सद्यस्थितीत केंद्र सरकारने पीओपीच्या गणेशमूर्तींना विक्रीसाठी हिरवा कंदील दाखवला असला, तरी ग्राहकांनी मात्र शाडू मातीच्या लहान आकाराच्या गणेशमूर्तींना पसंती दिली आहे. त्यामुळे एकट्या पेण तालुक्‍यात सुमारे 3 लाख पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीविना आहेत. 

मोठी बातमी : स्वच्छतेत नवी मुंबई राज्यात एक नंबर, फाईव्ह स्टार रेटींग्ज असणारे राज्यातील एकमेव शहर

ईको फ्रेंडली गणेशमूर्तींना मागणी 
गणेशभक्तही पर्यावरण संवर्धनासाठी तयार असून शाडू मातीच्या व नैसर्गिक रंगांपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींना चांगलीच मागणी वाढली आहे. विसर्जनानंतर बाप्पांची मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळून जातात आणि त्या पर्यावरणाला मारक ठरत नाहीत. त्यामुळे गणेशभक्त ईको फ्रेंडली गणेशमूर्तींना प्राधान्य देत आहेत. 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pen sculptors has lost billions in Ganesh Murti Business