पाच वर्षांपासून आंबोली कालवा रखडला; काम मार्गी लागताच 650 हेक्‍टर जमीन ओलिताखाली

मेघराज जाधव
Tuesday, 27 October 2020

मुरूड तालुक्‍यातील आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम पाच वर्षांपासून बंद पडले आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच समाधान मानावे लागत आहे. कालव्याचे रखडलेले काम मार्गी लागल्यास 650 हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे लालफितीत अडकलेले काम महाविकास आघाडी सरकारने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत. 

मुरूड : मुरूड तालुक्‍यातील आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम पाच वर्षांपासून बंद पडले आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच समाधान मानावे लागत आहे. कालव्याचे रखडलेले काम मार्गी लागल्यास 650 हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे लालफितीत अडकलेले काम महाविकास आघाडी सरकारने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत. 

आंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून 2015 पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. खारअंबोली धरणाची पाणी साठवणूक क्षमता प्रचंड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास सुमारे 650 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फळबागायत, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला आदी पूरक जोडधंद्याची संधी मिळणार आहे. वस्तुत: आंबोली धरणाचा शुभारंभ 2009 मध्ये पूर्ण झाला. त्यासाठी सरकारचे सुमारे 29 कोटी रुपये खर्च केले आहे. 

सविस्तर वाचा : नैना प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर कारवाई नाही; सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

आंबोली धरणामुळे मुरूडसह लगतच्या पंचक्रोशीतील 12 गावांची पाणी समस्या कायमस्वरूपी संपली आहे. नवीन शासन धोरणानुसार कालवे उघडे न ठेवता बंदिस्त असावेत. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करणे, त्यास प्रशासकीय मंजुरी घेणे या तांत्रिक बाबी समोर येत आहेत. याशिवाय, निधीच्या कमतरतेमुळे पाच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. 

अधिक वाचा : टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईत जीवघेणा हल्ला; कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचे बरीचशी रक्कम खर्च होत आहे. कोरोना आटोक्‍यात आल्यावर विविध प्रश्नांसाठी निधी प्राप्त होणार आहे. वेळ लागत असला, तरी आंबोली धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निधी मिळवणार, असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे. पाच वर्षांपासून रखडलेले आंबोली धरण यासंदर्भात विचारण्यासाठी लघु पाटबंधारे कार्यालयाशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. 

हेही वाचा : आता मुंबईतील स्ट्रीट लाईट होणार शॉक फ्री, BEST प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

आंबोली धरणाचे अपूर्ण काम 
उजव्यातीर कालवा : 7.10 किलोमीटरपैकी 6.10 कि.मी. 
डाव्यातीर कालवा :  2.64 किलोमीटरपैकी 1.64 कि.मी. 

आंबोली धरणातील कालव्यांची कामे रखडली ही वस्तुस्थिती आहे. आपण या प्रश्नी स्वतः विशेष लक्ष घालणार असून, सरकारी पातळीवर कालव्यांची कामे जलदगतीने कशी करता येतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत. 
- महेंद्र दळवी, स्थानिक आमदार 

आंबोली धरण साठ्याच्या केवळ 15 टक्के इतका पाणीसाठा वापरला जातो. डावा तीर कालवा तेलवडेपर्यंत, तर उजवा तीर कालवा खोकरीपर्यंत गेल्यास भूमिपुत्रांच्या जमिनी दुपिकी होतील. यातून स्थानिकांना मुबलक भाजीपाला मिळेल. तरी महाविकास आघाडीने तातडीने हा प्रकल्प मार्गी लावावा. 
- मनोज कमाने, स्थानिक शेतकरी 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pending Works of Amboli Canal From last Five Years