#SaathChal अलंकापुरीत वैष्णवांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 July 2018

आळंदी -
पंढरीची वारी आहे माझे घरी,
आणिक न करी तीर्थव्रत...

ही भावना उरी बाळगून राज्यभरातील दीड लाखाहून अधिक वारकऱ्यांचा मेळा आळंदीत गेल्या तीन दिवसांपासून दाखल झाला आहे. भाविकांच्या गर्दीने इंद्रायणीचे दोन्ही काठ पहाटेपासूनच फुलून गेले होते. दरम्यान, पावसामुळे इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळी वाढल्याने भक्ती सोपान पुलावरची दर्शनाची रांग शनी मंदिरमार्गे वळविण्यात आली.

पावसामुळे वारकऱ्यांची मुक्कामाच्या ठिकाणी त्रेधा उडाली. राहुट्यातून पाणी गेले होते. अनेकांनी धर्मशाळेचा आसरा घेतला. पावसाची तमा न बाळगता वारकरी हरिनामात दंग होता. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी इंद्रायणी नदीत दोरखंड लावण्यात आले होते. ध्वनिक्षेपकावरून वारंवार काळजी घेण्याबाबत भाविकांना सूचना देण्यात येत होत्या.

सकाळी बारापर्यंत माउलींच्या समाधीवर अभिषेक सुरू होता. दुपारनंतर महाद्वारातील पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला. पासधारकांनाच महाद्वारातून सोडण्यात येत होते. आळंदीतील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. 

मोफत रुग्णसेवेचे उद्‌घाटन
अलंकापुरी प्रतिष्ठानच्या वतीने आळंदी-पंढरपूर मार्गावर मोफत औषध वाटप आणि रुग्णचिकित्सा सेवेबरोबर रुग्णवाहिकेची सोय देण्यासाठी आज पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर आणि मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या हस्ते मोफत रुग्णसेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal crowd of devotees on Indrayani River