#SaathChal अवघी दुमदुमली देहूनगरी

Sakal | Friday, 6 July 2018

देहू -  ‘संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी, कई एकादशी आषाढी ये तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे’

देहू -
 ‘संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा
जावे पंढरीसी आवडी मनासी, कई एकादशी आषाढी ये
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे’

समस्त वारकऱ्यांच्या मनात गुरुवारी अशाच भावना दाटून आल्या. आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो-लाखो वारकऱ्यांचे डोळे पंढरीच्या वाटेकडे लागले होते. तुकोबा-विठोबाचे अखंड नामस्मरण... जोडीला टाळ-मृदंगाचा गजर यामुळे अवघी देहूनगरी दुमदुमली. इंद्रायणीकाठी जणू भक्तीचा मेळा लागला होता. देहूतील अवघे वातावरण भक्तिमय, विठुमय झाले होते. ‘विठ्ठल सखा, विठ्ठल मुखा, अवघी देहूनगरी झाली विठुमय’ याचा प्रत्यय जणू त्यातून येत होता.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दुपारी अडीच वाजता देऊळवाडा-देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.  

ऊन-सावलीचा खेळ आणि नंतर पावसाच्या हलक्‍या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला होता. प्रत्येक पाऊल देऊळवाड्याच्या दिशेने पडत होते. सोहळ्याची वेळ जवळ येताच वारकरी, दिंड्या देऊळवाड्याच्या महाद्वाराजवळ आल्या. सर्वप्रथम मानाच्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. देऊळवाड्यात दर्शनासाठी रांग होती. 

दुपारी चार वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर पालखी देऊळवाड्यात प्रदक्षिणेसाठी निघाली. परंपरेनुसार भैयासाहेब कारके यांनी पालखीवर चवरी ढाळण्याचा मान सांभाळला. ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष आणि विठूच्या गजर घालीत वारकरी फुगड्या धरू लागले. मानाच्या दिंड्या प्रदिक्षिणेसाठी पालखीसोबत होत्या. मानाचे अश्व, खाद्यांवर गरुडटक्के आणि हातात घेतलेले चोप, अब्दागिरी अशा दिमाखात पालखीने प्रदक्षिणा पूर्ण केली. तपोनिधी नारायण महाराज मंदिरात महाराजांच्या पादुका नेण्यात आल्या. त्यानंतर पालखी इनामदारवाड्याकडे मुक्कामी गेली.

तुकोबांच्या पादुका इनामदारवाड्यात 
 संत तुकाराम महाराजांच्या पादुका सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घोडेकर बंधू यांच्या घरातून इनामदारवाड्यात आणल्या गेल्या. मसलेकरांनी त्या डोक्‍यावर घेतल्या होत्या. इनामदारवाड्यात दिलीप महाराज गोसावी यांनी सपत्नीक पादुकांची पूजा केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. या वेळी पालखी सोहळाप्रमुख सुनील मोरे, अशोक महाराज मोरे, विठ्ठल महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, जालिंदर महाराज मोरे, सुनील दिगंबर मोरे उपस्थित होते.