#SaathChal माउलींची पालखी वाल्मीकीनगरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 July 2018

वाल्हे - पुंडलिक वरदेऽ, हरी विठ्ठल ऽऽ  श्री ज्ञानदेव तुकारामऽऽऽ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज वाल्मीकीनगरीत दाखल झाला. त्याचवेळी वरुणराजाने तुरळक सरींचा वर्षाव करत, तर वाल्हे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, या वर्षीही ग्रामप्रदक्षिणेला फाटा देत पालखी थेट तळावर जाऊन विसावली. 

वाल्हे - पुंडलिक वरदेऽ, हरी विठ्ठल ऽऽ  श्री ज्ञानदेव तुकारामऽऽऽ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज वाल्मीकीनगरीत दाखल झाला. त्याचवेळी वरुणराजाने तुरळक सरींचा वर्षाव करत, तर वाल्हे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, या वर्षीही ग्रामप्रदक्षिणेला फाटा देत पालखी थेट तळावर जाऊन विसावली. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रिमझिम पावसाच्या धारा आणि विठुनामाच्या गजरात वाल्हे (ता. पुरंदर) येथे आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आगमन झाले. सरपंच अमोल खवले व उपसरपंच वैशाली पवार यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, सचिन लंबाते, प्रवीण कुमठेकर, गिरीश पवार उपस्थित होते.

सुकलवाडी येथे रेल्वे फाटकाजवळील भव्य प्रांगणात दुपारी सव्वादोन वाजता पालखी विसावली. पालखी तळावर प्रवेश केल्यानंतर पालखीभोवती दिंड्यांनी रिंगण केले. चोपदारांनी सूचना केल्यानंतर लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. आरतीनंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेतले.

पालखी तळावर पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, अजित कुलकर्णी, पुणे ग्रामीणच्या पोलिस उपअधीक्षक तेजस्विनी सातपुते, भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी  अण्णासाहेब जाधव, तहसीलदार सचिन गिरी, रामदास शेळके, अंकुश माने, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, वीरकुमार गायकवाड, तलाठी नीलेश पाटील, बापूसाहेब देवकर, सुधीर गिरमे, प्रमोद झुरुंगे यांच्या उपस्थितीत पालखी मुक्कामाबाबत चर्चा झाली. 

माळवाडी येथे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि पुण्यातील माया ग्रुप व अमृता प्रिंटर्स यांच्या वतीने जवळपास ३० हजार वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार व शिवाजी पवार यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी शिऱ्याचे वाटप करण्यात आले. वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने ठीकठिकाणी सोहळ्यासाठी पाण्याचे टॅंकर भरण्याची, तसेच अंघोळीसाठी पाण्याची सोय केल्याचे ग्रामसेवक बबन चखाले यांनी सांगितले.

पालखी तळावर येण्यास उशीर! 
दौंडज खिंडीत विसावा घेऊन पालखी सोहळा बाराच्या सुमारास वाल्हे गावात प्रवेश करतो. मात्र, दौंडज खिंड ते नीरापर्यंतचा पालखीमार्ग रखडल्याने, तसेच पालखीतील वाढती गर्दी, पोलिस प्रशासनाच्या अपुऱ्या योजना यामुळे वाहनांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. याशिवाय पालखी तळावर येण्यास सव्वादोन तास लागल्याने समाज आरतीला उशीर झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal wari palkhi sant dnyaneshwar maharaj