#SaathChal माउलींची पालखी सातारा जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 July 2018

गुळुंचे - माउलीऽ माउलीऽऽ नामाच्या जयघोषात आज संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. त्यानंतर माउलींच्या पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचा आज लोणंद येथे मुक्काम असणार आहे. 

गुळुंचे - माउलीऽ माउलीऽऽ नामाच्या जयघोषात आज संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. त्यानंतर माउलींच्या पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचा आज लोणंद येथे मुक्काम असणार आहे. 

वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा नीरेकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहारीसाठी पिंपरे खुर्द येथील अहल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरीच्या समोर विसावला. नीरा येथे पालखी सोहळा अकराच्या सुमारास दाखल झाला. शिवाजी चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य गोरखनाथ माने, सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नेते दत्ता चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सुभाष लिंबरकर उपस्थित होते. येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी माउलींच्या पादुका दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

विसाव्यानंतर प्रथेप्रमाणे विश्वस्तांनी माउलींच्या पादुका नीरा स्नानासाठी नेल्या. दत्त घाटावर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलीऽ माउलीऽऽ नामाच्या गजरात पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. गर्दीमुळे अवघा घाट भक्तिमय झाला होता. माउलींच्या नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याला जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक, उपअधीक्षक तेजस्विनी सातपुते, भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, रामदास शेळके, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के आदींनी निरोप दिला. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव माणकुंभरे, वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे, खंडाळ्याचे सभापती मकरंद मोटे, खंडाळ्याच्या गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

नीरास्नानाची जागा बदलली
नीरा हद्दीत पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर शिवाजी चौकात पडलेल्या खड्ड्यात पाणी साठल्याने तेथून जाताना वारकऱ्यांची गैरसोय झाली. यंदाही अचानक नीरा स्नानाची जागा बदलण्यात आली. गेल्या वर्षी घातलेल्या जागेच्या अलीकडे या वर्षी नीरास्नान घालण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal wari palkhi sant dnyaneshwar maharaj