#SaathChal दौंडज खिंडीत न्याहारीसाठी विसावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 July 2018

जेजुरी - हिरवागार डोंगर, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, थंडगार वारा अशा वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीपासून तीन किलोमीटरवरील दौंडज खिंडीत सकाळी न्याहारीसाठी विसावला होता. भाजी-भाकरी व फराळाचा आस्वाद घेत वारकरी गावाकडच्या गप्पांत रंगून गेले होते. जणू हिरव्यागार डोंगरात भक्तीचा मळा फुलला होता. 

जेजुरीच्या पालखीतळावरून सकाळी सहा वाजता माउलींची पालखी पुढे मार्गस्थ झाली. पालखीला निरोप देण्यासाठी जेजुरीकर खिंडीपर्यंत चालत आले होते. 

एमआयडीसी परिसरात रस्ता चौपदरी झाल्याने पालखी आठ वाजताच दौंडज खिंडीत पोचली. येथे जेजुरी, कोळविहिरे व दौंडज तीन गावची शिव आहे. कोळविहिरे, भोरवाडी, तरसदरा या परिसरातील ग्रामस्थ येथे माऊलींच्या दर्शनासाठी येतात. खिंडीच्या मधोमध पालखी न्याहारीसाठी एक तास विसावली होती. 

वारकरी माळरानावर बसून न्याहारीचा आस्वाद घेत होते. अनेकजण मोबाईलमध्ये येथील निसर्गसौंदर्य चित्रित करीत होते. महिला वारकऱ्यांना उसंत मिळाल्याने कपडे वाळविण्याची घाई सुरू होती. कपड्यांच्या विविध रंगांनी हिरवा डोंगर फुलपाखरासारखा रंगीबेरंगी दिसत होता. सकाळच्या वेळी दोन तीन वेळा पावसाच्या सरी आल्या. पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. 

कोळविहिरे गावच्या सरपंच मंगल झगडे, सुरेश झगडे, रोहिदास कुदळे व इतर ग्रामस्थ यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. खिंडीत रेल्वे मार्ग असल्याने रेल्वेची नागमोडी वळणे व येणाऱ्या रेल्वेगाड्या वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. 

खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी
खंडोबाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी पहाटेही गर्दी केली होती. अनेक जण खंडोबाचे दर्शन घेऊन वारीत सहभागी झाले होते. खंडोबाचे मूळ स्थान असलेल्या कडेपठारला वारकऱ्यांची गर्दी दिसत होती. कडेपठारचे भाविक दौंडज खिंडीत वारीत पुन्हा सहभागी होत होते. यंदा पाऊस वेळेवर सुरू झाल्याने शेतीची कामे उरकल्याने शेतकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal wari palkhi sant dnyaneshwar maharaj dondaj