#SaathChal तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

मुकुंद परंडवाल
Friday, 6 July 2018

देहू - दास झालो हरिदासांचा । बुद्धिकायामनेंवाचा ।। १।।
       तेथे प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ। 
नासें दृष्टबुद्धि सकळ । 
समाधी हरी कीर्तनी ।। धृ।। 
ऐकता हरिकथा । भक्ती लागे त्या अभक्तां ।। २ ।।
          देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ।। ३।।
             हे सुख ब्रम्हादिकां । म्हणे नाहीं नाहीं तुका ।। ४ ।।

देहू - दास झालो हरिदासांचा । बुद्धिकायामनेंवाचा ।। १।।
       तेथे प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ। 
नासें दृष्टबुद्धि सकळ । 
समाधी हरी कीर्तनी ।। धृ।। 
ऐकता हरिकथा । भक्ती लागे त्या अभक्तां ।। २ ।।
          देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ।। ३।।
             हे सुख ब्रम्हादिकां । म्हणे नाहीं नाहीं तुका ।। ४ ।।
पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्याची आस लागलेल्या लाखो वैष्णवांचा मेळा गुरुवारी (ता. ५) देहूतील इंद्रायणीकाठी जमला. निमित्त होते संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे. हाती भगव्या पताका.. मुखी ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष..त्याला टाळ-मृदंगाची साथ अशा भक्तिमय वातावरणात संत तुकोबारायांच्या पालखीने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. वरुणराजाच्या अभिषेकाने अवघी देहूनगरी न्हाऊन निघाली. 

देऊळवाड्यात रंगलेला हा प्रस्थान सोहळा राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी ‘याची देही, याची डोळा, अनुभवला हा सुखसोहळा’ अशी अनुभूती या वेळी भाविकांना आली. भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून देऊळवाड्यात गर्दी केली होती. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. 

पारंपरिक कार्यक्रम
परंपरेनुसार पहाटे साडेचार वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाले. पहाटे पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे, अशोक मोरे, विठ्ठल मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात अध्यक्ष बाळासाहेब  मोरे, विश्वस्त सुनील मोरे, जालिंदर मोरे, अभिजित मोरे यांच्या हस्ते पूजा झाली. वैकुंठस्थान मंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते झाली. सकाळी दहा वाजता संभाजी महाराज मोरे यांचे पालखी सोहळ्याचे काल्याचे कीर्तन झाले. ‘पाहती गवळणी, तवती पालथी दुधानी’ या अभंगावर निरूपण केले. साडेदहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतील घोडेकर बंधू(सराफ) यांनी चकाकी देऊन इनामदारवाड्यात आणल्या.

दिलीप महाराज गोसावी इनामदार यांनी सपत्निक पादुकांची पूजा केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. 
पूजा सुरू झाल्यानंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश देण्यात आला. मोहितेपाटील व बाभुळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश केला. पादुका पूजनानंतर फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. देऊळवाड्यात मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. देऊळवाड्यातील मंदिर प्रदक्षिणा सुरू झाली. वारकरी ज्ञानोबा तुकारामचा नामघोष आणि विठुनामाचा गजर करीत फुगड्या धरू लागले. देहभान विसरून वारकरी आनंदाने नाचत होते. प्रदक्षिणेसाठी मानाच्या दिंड्या सज्ज होत्या. मानाचे अश्व होते. खांद्यावर गरुडटके आणि हातात चोप घेतलेले चोपदार होते. 

देऊळवाड्यातील प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीस्थळी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची भेट घडविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पालखी सोहळा इनामदारवाड्यात मुक्कामी पोचला. शुक्रवारी (ता. ६) सकाळी १० वाजता पालखी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ होईल.

मान्यवरांच्या हस्तेही पूजा
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्नी गिरिजा यांच्या समवेत महापूजा केली. खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार बाळा भेगडे यांच्या हस्तेही महापूजा झाली. पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिर मराठा मंडळ आणि आषाढी वारीतील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक चारमधील ज्येष्ठ वारकरी सदाशिव भोरेकर यांनाही पूजेचा मान मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Sant Tukaram maharaj