Wari 2019 : माउलींना सांभाळणारे भोजलिंगकाका उपेक्षितच

विलास काटे / गणेश पांडे
मंगळवार, 25 जून 2019

भोजलिंगकाकांचे येथे मोठे स्मारक व्हावे, यासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून निधी मिळावा, यासाठी आम्ही अर्ज, विनंत्या करत आहोत; पण सरकारदरबारी आमची दखल घेतली जात नाही.
- शिवराम पांचाळ, अध्यक्ष, श्री संत भोजलिंगकाका स्मृती प्रतिष्ठान

आळंदीतील समाधी आणि पोहंडुळ येथील जन्मस्थळ दुर्लक्षित
आळंदी / परभणी - ज्या काळात संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना आळंदीत कुणीही आश्रय देत नव्हते, त्या वेळी त्यांना मायेने सांभाळले ते भोजलिंगकाका यांनी. मात्र या भोजलिंगकाकांची आळंदीतील समाधी आणि पोहंडुळ (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील जन्मस्थळ उपेक्षित आहे.

आळंदीत संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिराच्या शेजारीच भोजलिंगकाका यांची समाधी आहे. दर्शनबारीत भोजलिंगकाकांच्या समाधी मंदिरासमोर "श्री भोजलिंगकाका हे पेशाने सुतार होते.

निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या भावंडांना भोजलिंगकाकांनी अंगाखांद्यावर खेळविले आहे, त्यामुळे ही भावंडे त्यांना काका म्हणत,' अशा आशयाचा संगमरवरी फलक लावलेला आहे. या व्यतिरिक्त कोणतीही माहिती मिळत नाही. त्यांच्या समाधी मंदिरात अंधार आणि अस्वच्छता असल्याने भाविक तिकडे फिरकत नाहीत.

पोहंडुळमध्ये जन्मस्थळ
दुसरीकडे भोजलिंगकाकांचे जन्मस्थळ असणारे पोहंडुळ हे गाव परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरापासून 16 किलोमीटरवर आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळच श्री संत भोजलिंगकाका यांचे स्मृतिस्थळ आहे. याच स्मृतिस्थळापासून काही अंतरावर पांढऱ्या मातीची गढी आहे, तेथे संत भोजलिंगकाका यांचा जन्म झाला असल्याचे सांगितले जाते. मात्र, हे ठिकाण दुर्लक्षित आहे.

(या विषयावरील सविस्तर रिपोर्ताज वाचा, "सकाळ'च्या "विठाई' या आषाढी वारी विशेषांकात. #वारी _सलोख्याची या लिंकवर व्हिडिओही पाहता येईल. गुरुवारपासून (ता. 27) अंक विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी संपर्क - 9881598815)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Bhojlingkaka