पुणे जिल्ह्यात सरपंचपदासाठी 10 तर सदस्यपदासाठी 22 अर्ज दाखल

संतोष आटोळे
मंगळवार, 8 मे 2018

जिल्ह्यातील जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या एकूण 90 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता.08) रोजी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर जिल्ह्यात सरपंचपदासाठी 10 तर सदस्यपदासाठी 22 अर्ज दाखल झाले आहेत.

शिर्सुफळ : जिल्ह्यातील जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या एकूण 90 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता.08) रोजी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर जिल्ह्यात सरपंचपदासाठी 10 तर सदस्यपदासाठी 22 अर्ज दाखल झाले आहेत. तर 258 ग्रामपंचायतींच्या 456 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी 3 तर सात ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आज अखेर वेल्हे, भोर, दौंड, बारामती, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यांमधून एकही अर्ज दाखल झाला नाही. तर पुरंदरमधून दोन, इंदापूर एक, जुन्नर दोन, खेड एक, शिरुर चार असे एकूण 10 अर्ज दाखल झाले आहेत. तर सदस्य पदासाठीही पुरंदरमधून दहा, इंदापूर एक, जुन्नर सहा, खेड तीन, शिरुर दोन, असे एकूण 22 अर्ज दाखल झाले आहेत. तर पोटनिवडणुकांमध्ये सात गावांच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही तर सदस्य पदासाठी फक्त बारामतीमधून तीन अर्ज दाखल झाले आहेत. इतर ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नाही. शनिवार (12 मे ) पर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

आॅनलाईन अर्जामुळे अनेकांची पंचाईत

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये उमेदवारांमध्ये आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांची पंचाईत होत असतानाचे पहायला मिळत आहे. त्यामध्ये मालमत्तेसह आवश्यक असणारी सर्व माहिती भरताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहे. यामध्ये अनेक उमेदवार कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेत आहेत. तर अशिक्षित उमेदवारांची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

निवडणुका होत असलेला तालुका, ग्रामपंचायत संख्या 
वेल्हा - 1, मावळ - 7, भोर - 6, जुन्नर - 3, मुळशी - 1, पुरंदर - 13, खेड - 13, आंबेगाव - 10, बारामती - 15, शिरुर - 6, इंदापूर - 5, दौंड - 10

एकूण - 90 

Web Title: 10 nomination application for Sarpanch in Pune District