शहरात शंभर टक्के एलइडीकरण

मिलिंद वैद्य
शनिवार, 17 डिसेंबर 2016

गुड गव्हर्नन्सचा वापर करून विजेची बचत आणि पारंपरिक ऊर्जानिर्मितीचे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेची मुख्य इमारत व तारांगणमध्ये 50 किलोवॉटचा सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण करणार आहोत. ऊर्जाबचतीत आघाडीवर राहण्याचा आमचा संकल्प आहे.

- प्रवीण तुपे, सहशह

महापालिकेचा ऊर्जाबचतीतून दीड कोटी वाचविण्याचा प्रयत्न
पिंपरी - महापालिकेमार्फत ऊर्जाबचतीसाठी विशेष उपाययोजना
केल्या जात आहेत. वर्षभरात शहरातील सर्व रस्त्यांचे शंभर टक्के एलइडीकरण होणार असून, प्रतिवर्षी एक कोटी 35 लाख रुपयांची बचत केली जाणार आहे. अपारंपरिक ऊर्जा (हरित ऊर्जा ) उपक्रमांतर्गत सौरऊर्जा प्रकल्पही हाती घेतले जाणार आहेत.

आतापर्यंत विविध रस्त्यांवर 76 हजार 798 एलइडी दिवे बसविले आहेत. चालू आर्थिक वर्षात 40 ते 220 वॉट क्षमतेचे आणखी दहा हजार दिवे बसविले जातील. सुमारे पाच कोटींची ही योजना आहे. त्यानंतर महापालिकेच्या वीजबिलात एक कोटी 35 लाख रुपयांची बचत होणार आहे. एलइडी फिटिंग्जसाठी होणारा खर्च साधारणतः चार वर्षात वसूल होणार आहे. 2003 मध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे प्रथम पारितोषिक महापालिकेला मिळाले होते. आता पुन्हा त्या दिशेने विद्युत विभागाची वाटचाल सुरू आहे. त्यासाठी 45 अभियंत्यांची टीम कार्यरत आहे.

एलइडी दिवे बसविले...
2014-15 ----16 हजार 554
2015-16 ----06 हजार 127

महापालिकेच्या वीजबिलातील त्रुटी, नादुरुस्त वीजमीटर वेळेवर बदलणे, इमारतींचे वीजदर संकेत, वीजबिलातील आवश्‍यक दुरुस्त्या यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक महिन्याला वेळेत बिल भरल्याबद्दल यंदा महापालिकेला ऑक्‍टोबरअखेरपर्यंत साडेअठ्ठावीस लाख, तर वीजवहनाचा चांगला गुणांक राखल्याबद्दल दोन कोटी रुपयांहून अधिक इन्सेंटिव्ह मिळाला आहे. पालिकेने आता हरित ऊर्जानिर्मितीवर लक्ष केंद्रित केले असून, त्यातून 10 लाख 40हजार रुपये प्रतिवर्ष बचत अपेक्षित आहे.

भारतातील पहिला अभिनव उपक्रम
नव्याने खरेदी केल्या जाणाऱ्या एलइडी फिटिंग्जचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये रिअल टाइम क्‍लॉक (टायमर) व डिमिंग मोड यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे हे दिवे संध्याकाळी सहापासून रात्री बारापर्यंत शंभर टक्के क्षमतेने चालू राहतात. रात्री बारापासून सकाळी सातपर्यंत 50 टक्के क्षमतेने प्रकाश देतील आणि दिवसा देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत तीस टक्के प्रखरतेने चालू राहू शकतील. त्यामुळे 70 टक्के विजेची बचत होईल. या फिटिंग्जची पाच वर्षे वॉरंटी असल्याने देखभाल दुरुस्तीचा खर्च वाचणार आहे. एलइडी फिटिंग्जमध्ये अशी यंत्रणा बसविणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महापालिका असेल. या दिव्यांच्या खरेदीचा खर्च तीन ते चार वर्षांत स्ट्रीट लाइट बिलात होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून वसूल होणार आहे.

वीजबिलात मिळालेली सवलत
वर्ष रुपये

2015-16 51,37,498
2016-17 28,60,947 (आक्‍टोबरअखेर)

वीज गुणांक इन्सेंटिव्ह
2015-16 3,38,54,152
2016-17 2,04,29,417 (आक्‍टोबरअखेर)

हरित ऊर्जेची निर्मिती
क्षमता युनिट
चालू निर्मिती 1 किलो वॉट 1,600
यंदाचे उद्दिष्ट 50किलो वॉट 80,000

Web Title: 100% city led