
पुणेकरांशी भावनिक नाते असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार केला असला तरी त्यात बदल करण्यात येणार आहेत.
बालगंधर्वच्या पुनर्विकासाला लागणार १०० कोटी
पुणे - पुणेकरांशी भावनिक नाते असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharva Auditorium) पुनर्विकासाचा आराखडा (Redevelopment Plan) तयार केला असला तरी त्यात बदल करण्यात येणार आहेत. मुख्य नाट्यगृहाची क्षमता ८०० इतकीच दाखविण्यात आली असून, ती अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाट्यगृह किमान १ हजार क्षमतेचे असले पाहिजे, त्याचे सुशोभीकरण आणखी देखणे होणे आवश्यक आहे, अशा सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्या मंजूर केलेला आराखडा अंतिम नसून, त्यात बदल होणार आहेत. दरम्यान, जुने नाट्यगृह पाडून तेथे नवे संकुल उभारण्यासाठी किमान १०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिराला ५० वर्ष पूर्ण झालेली आहेत. अनेक वेळा दुरुस्ती करूनही कलाकारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी आर्किटेक्ट निवडीसाठी महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली होती. महापालिकेने जाहिरात देऊन यासाठी अर्ज मागविले होते. त्यात ५७ जणांचे अर्ज आले. तर त्यापैकी २६ जणांनी पुनर्विकासाचे ड्रॉइंग सादर केले. ५ मार्च २०१९ आणि ६ मार्च २०१९ या दोन दिवसात उपसमितीपुढे २४ आर्किटेक्टने त्यांचे सादरीकरण केले. त्यामध्ये ८ जणांची निवड करून हा त्याचे प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखालील मुख्य निवड समितीसमोर ठेवण्यात आले. २९ मे २०१९ रोजी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय येथे झालेल्या बैठकीत ८ आर्किटेक्टचे सादरीकरण झाले. त्यानंतर १४ आॅगस्ट २०१९, ३ डिसेंबर २०२०, ५ जानेवारी २०२१, १५ जानेवारी २०२१ आणि १ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकांमध्ये चर्चा करून आठ पैकी एक आर्किटेक्टची निवड करण्यात आली. त्यानंतर कोरोनामुळे गेला दोन वर्ष यासंदर्भातील प्रक्रिया ठप्प झाली. अखेर ६ मे २०२२ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले.
बालगंधर्वच्या पुनर्विकासामध्ये ८०० क्षमतेचे एक मोठे नाट्यगृह, ५०० आणि ३०० क्षमतेचे दोन नाट्यगृह बांधले जाणार आहेत. तसेच नदीच्या बाजूने खुले सभागृह असतील. त्याच १० हजार आणि ५ हजार चौरस फुटाचे दोन कालदालनाचा समावेश आहे. तर २५० कार आणि ८०० दुचाकी क्षमतेचे वाहनतळ येथे असणार आहे. अजित पवार यांच्यासमोर हे सादरीकरण झाले असता त्यांनी त्यामध्ये बदल करण्यच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. नाट्यगृहाची क्षमता ८०० कमी असून, ते किमान १ पेक्षा जास्त क्षमतेचे असले पाहिजे. नवे बालगंधर्व अधिक सुंदर, आकर्षक असले पाहिजे, नाट्यगृहाचे प्रवेशद्वार भव्य असावे त्यावरही भर द्या अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
बीकेसीतील नाट्यगृह पहा
नवे बालगंधर्व सुंदर असले पाहिजे, त्यासाठी मुंबईतील बीकेसीतील नाट्यगृह जाऊन बघा, तेथील अंतर्गत सजावट कशी आहे ते पाहून त्याप्रमाणे बालगंधर्वमध्ये बदल करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत त्यांनी बालगंधर्वच्या पुर्नविकासाच्या आराखड्यात बदल सुचविले आहेत. नाट्यगृहाची क्षमता जास्त असली पाहिजे तसेच सुशोभीकरणासाठी मुंबईतील मॉल बघा अशी सूचना केली आहे. तेथे पाहणी केल्यानंतर सुधारित आराखडा तयार केला जाईल. नाट्यगृहाच्या बांधकामासाठी ७० कोटी तर अंतर्गत सुशोभीकरणासाठी ३० कोटी असा १०० कोटी पर्यंत खर्च येईल. या कामासाठी ३ वर्षाचा कालावधी लागू शकतो.’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
Web Title: 100 Crore For Pune Balgandharva Auditorium Redevelopment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..