विशेष फेरीमध्ये 11 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी' घेण्यात येईल. याचे वेळापत्रक गुरुवारनंतर (ता. 23) जाहीर केले जाणार आहे. 

पुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 11 हजार 47 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. या फेरीनंतरही महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी' घेण्यात येईल. याचे वेळापत्रक गुरुवारनंतर (ता. 23) जाहीर केले जाणार आहे. 

अकरावी प्रवेशाच्या चौथ्या फेरीतील प्रवेश झाल्यानंतरही 20 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. त्यांना प्रवेश घेता यावेत, म्हणून केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने विशेष फेरी जाहीर केली. यातील गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर केली. यात तीन हजार 539 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमांकाचे महाविद्यालय मिळाले. या फेरीनंतरही 10 हजारांच्या आसपास विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असण्याची शक्‍यता आहे. विशेष फेरीनंतरही प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारनंतर स्वतंत्र फेरी जाहीर करण्यात येईल. यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश दिले जातील. आतापर्यंत अर्ज ब्लॉक असलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत संधी मिळणार असल्याचे प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांना विशेष फेरीत पसंतीक्रमानुसार मिळालेल्या प्रवेशाची आकडेवारी : 
पसंतीक्रम : कला : वाणिज्य : एचएसव्हीसी : विज्ञान : एकूण 
पहिला : 329 : 1657 : 237 : 1316 : 3539 
दुसरा : 114 : 1104 : 0 : 1233 : 2451 
तिसरा : 90 : 723 : 02 : 761 : 1576 
चार ते दहा : 177 : 1722 : - : 1582 : 3481 

विशेष फेरीतील प्रवेशाचा कालावधी : 
- विशेष फेरीतील गुणवत्ता यादीत प्रवेश निश्‍चित झालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत (ता. 21) महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येतील. सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. 

अशी असेल "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी' 
- स्वतंत्र वेळापत्रक 23 ऑगस्टनंतर होणार जाहीर 
- अकरावी प्रवेशाच्या लिंकवर स्टुडंट लॉगिन करावे 
- या फेरीत विद्यार्थ्यांना शाखा बदलण्याचा पर्याय निवडता येईल 
- संबंधित महाविद्यालयांची यादी दिसेल, शिवाय महाविद्यालयाचे नावही टाइप करण्याची सोय असेल 
- महाविद्यालयावर क्‍लिक केल्यास रिक्त जागा दिसतील 
- त्या रिक्त जागेवर क्‍लिक केल्यास ज्यांचा क्‍लिक प्रथम असेल, त्याचा प्रवेश निश्‍चित होईल 
- प्रवेश निश्‍चित झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित संदेश येईल 
- त्याची प्रिंट आउट काढून संबंधित विद्यार्थ्याने महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा 
 

Web Title: 11 thousand students are admitted in the special round