शिष्यवृत्तीविना ११ हजार विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

शैक्षणिक वर्ष सरत आले तरी महापालिकेकडून कार्यवाही नाही

शैक्षणिक वर्ष सरत आले तरी महापालिकेकडून कार्यवाही नाही

पुणे - दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शैक्षणिक वर्ष सरत आले तरी अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. दहावीचे ८ हजार ४२४ आणि बारावीचे २ हजार ३९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या शिष्यवृत्तीसाठी महापालिकेने गेल्यावर्षी जून- जुलैपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला. त्याबाबतची प्रक्रिया ऑगस्ट- सप्टेंबरपर्यंत सुरू होती.  महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही रक्कम विद्यार्थ्यांना देता आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते आहे.

शिष्यवृत्ती थेट बॅंक खात्यात
महापालिकेने गेल्यावर्षी शिष्यवृत्तीची रक्कम धनादेशाद्वारे विद्यार्थ्यांना दिली होती. प्रत्यक्षात नगरसेवकांनी या धनादेशांचा ताबा घेत स्वतःच्या कार्यालयांत विद्यार्थ्यांना बोलावून त्याचे वाटप केले होते. या प्रकारावर जोरदार टीका झाली आणि महापालिकेने शिष्यवृत्तीची रक्‍कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यातच जमा करावी, अशी मागणी विविध संस्था आणि संघटनांनी केली होती.

३१ मार्चपर्यंत शिष्यवृत्ती देणार
याबाबत महापालिकेच्या नागरवस्ती विभागाचे प्रमुख सुहास रांजणे म्हणाले, ‘‘लागोपाठ दोन निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्याने शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना देता आली नाही. मात्र, ३१ मार्चपर्यंत ही रक्कम देण्यात येईल. महापालिकेकडून प्रत्येक विद्यार्थ्याची रक्कम थेट त्याच्या बॅंक खात्यात जमा करता येईल का, या पर्यायावरही विचार सुरू आहे. त्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल.’’

Web Title: 11 thousand students without scholarship