अकरा गावातील आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा कधी

दिलीप कुऱ्हाडे
मंगळवार, 8 मे 2018

समावेश झालेल्या अकरा शाळेत जिल्हा परिषेदेच्या इयत्ता पहिले ते सातवी पर्यंतच्या अकरा प्राथमिक शाळेत सहा हजार विद्यार्थी व दीडशे शिक्षक आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर या शाळा व आरोग्य उपकेंद्र पुणे महानगरपालिकेत वर्ग व्हावेत अशी येथील नागरिकांची मागणी आहे. 

पुणे : नव्याने समावेश झालेल्या अकरा गावातील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र व शाळा पुणे महानगरपालिकेत अद्याप वर्ग झाले नाहीत. महापालिकेने ग्रामपंचायतींचे दप्तर, स्थानिक जंगम मालमत्ता ताब्यात घेतले आहे. येथील रहिवाशांनाकडून मालमत्ता कर सुध्दा आकारण्यास सुरूवात केली आहे. मात्र आरोग्य सुविधा व शैक्षणिक सुविधा कधी असा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे. 

पुणे महानगरपालिकेत लोहगाव, केशवनगर, साडेसतरा नळी, उंड्री, उरूळी देवाची, फुरूसुंगी, शिवणे, आंबेगाव खुर्द, धायरी, आंबेगाव ब्रु.आणि उत्तमनगर या गावांचा समावेश झाला आहे. यागावापैकी फुरूसुंगी मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर काही गावांमध्ये उपआरोग्य केंद्र आहेत. पुणे जिल्हा परिषद विशेषत: येथील आरोग्य केंद्रांत प्रसूतिगृहांसह बाह्यरुग्ण विभाग आणि गरोदरमाता आणि बालकांचे लसीकरणाची सुविधा देत आहेत. मात्र या गावांतील लोकसंख्येचा विचार करता येथील मनुष्यबळ व साधनसामुग्री पुरेशा नाहीत. 

समावेश झालेल्या अकरा शाळेत जिल्हा परिषेदेच्या इयत्ता पहिले ते सातवी पर्यंतच्या अकरा प्राथमिक शाळेत सहा हजार विद्यार्थी व दीडशे शिक्षक आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर या शाळा व आरोग्य उपकेंद्र पुणे महानगरपालिकेत वर्ग व्हावेत अशी येथील नागरिकांची मागणी आहे. 

‘‘ अकरा गावातील सर्व शाळेतील शिक्षक महापालिकेत वर्ग होण्यासंदर्भात लवकरच निर्णय होईल. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून या गावांतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या सोई-सुविधा मिळतील.’’
शिवाजी दौंडकर, शिक्षणप्रमुख, शिक्षण मंडळ, पुणे महानगरपालिका

‘‘ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त महापालिका आयुक्त यांची बैठक होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन कोणी द्यायचा हा निर्णय झाल्यावर येथील आरोग्य उपकेंद्र महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग होतील.’’
- डाॅ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका 

‘‘अकरा गावांतील लोकसंख्येचा विचार करता येथील मनुष्यबळ व साधनसामुग्री पुरेशा नाहीत. तर पावसाळ्यात साथरोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आवश्‍यक प्रतिबंध करण्यासाठी अडचणी येऊ शकतात’’
- रमेश साळवे, लोहगाव

‘‘ येत्या शैक्षणिक वर्षांपासून अकरा गावातील सर्व शाळा व शिक्षक पुणे महानगरपालिकेत वर्ग होणे आवश्‍यक आहे. तरच या गावातील शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शैक्षणिक सोई-सुविधा मिळतील.’’
- रमेश खांदवे, माजी सदस्य, शिक्षण मंडळ , पुणे महानगरपालिका

Web Title: 11 village include in Pune Municipal Corporation area