बाटलीबंद पाण्याच्या १२ कारखान्यांना टाळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

विनापरवाना उत्पादन घेतल्याने ‘एफडीए’ची कारवाई

पुणे - विनापरवाना बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणारे पुणे विभागातील १२ कारखाने तातडीने बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. त्यात पुण्यातील सात, सोलापूर येथी चार आणि कोल्हापूर येथील एका कारखान्याचा समावेश आहे. 

उन्हाळ्यामुळे पुणे विभागात पिण्याच्या पाण्याची मागणी वेगाने वाढली आहे. अशा वेळी बाटलीबंद पिण्याच्या पाण्याला लोकांनी प्राधान्य दिले आहे. मात्र, या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणाऱ्या पुणे विभागातील कारखान्यांची तपासणी करण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती देताना ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई म्हणाले, ‘‘बाटलीबंद पेयजलाचे उत्पादन करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो आणि अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचा परवाना आवश्‍यक आहे. तपासणी केलेल्या १२ कारखान्यांनी हा परवाना घेतला नव्हता. त्यामुळे त्यांनी बाटलीबंद पाण्याचे उत्पादन तातडीने थांबवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.’’

बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करताना योग्य प्रक्रिया होत नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. पाण्याची गुणवत्ता तपासण्याची कोणतीही सुविधा कारखान्यांमध्ये नव्हती. त्यामुळे जनतेच्या आरोग्यासाठी हे पाणी धोकादायक असल्याने त्यांचे उत्पादन थांबविण्यात आल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. 
 
बाटलीबंद पाणी घेताना काळजी घ्या
कॅनवर भारतीय मानक ब्युरोचे मान्यताचिन्ह आहे का?
पाण्याची गुणवत्ता तपासण्याच्या चाचण्या केल्या आहेत का?
कॅन योग्य पद्धतीने बंद केले आहे का?
कॅनमधील पाणी किती दिवसांपूर्वी भरले आहे?

Web Title: 12 water factory seal