लेटलतीफ कर्मचाऱ्यांना विदाउट पे: तुकाराम मुंढे

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

पीएमपीच्या 100 नादुरुस्त बस पुन्हा दुरुस्त करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधीही व्यवस्थापकीय संचालकांकडून मंजूर करण्यात आला. या बस येत्या 15 दिवसांत रस्त्यावर येतील, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.

पुणे - पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी आज (गुरुवार) कर्तव्यकठोर कारभाराची चुणूक दाखवित उशिरा आलेल्या 120 कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय घेतला.

याचबरोबर, पीएमपीच्या 100 नादुरुस्त बस पुन्हा दुरुस्त करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधीही व्यवस्थापकीय संचालकांकडून मंजूर करण्यात आला. या बस येत्या 15 दिवसांत रस्त्यावर येतील, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे. मुंढे यांनी पीएमपीच्या व्यवस्थापकीय्य संचालकपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली आहे. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्याकडून घेण्यात आलेले हे निर्णय त्यांच्या भविष्यातील कारभाराची दिशा दाखविणारे असल्याचे मानले जात आहे.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मुद्यावरून नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदावरून मुंढे यांची राज्य सरकारने नुकतीच बदली केली आणि त्यांना पीएमपीचे अध्यक्ष केले. 

नवी मुंबईत आयुक्त म्हणून काम करताना परिवहन समितीचेही काम बघितले आहे. नवी मुंबईत सुमारे ५०० बस आहेत आणि दररोज तीन लाख प्रवासी त्या सेवेचा लाभ घेतात. या समितीचे काम बघतानाचा अनुभव पुण्यात नक्कीच उपयोगी पडेल. तेथे काही निर्णय घेऊन सुधारणा केल्या होत्या. त्या धर्तीवर पुण्यातील कामकाज समजून घेतल्यावर काही निर्णय घेतले जातील. अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी पीएमपीची सखोल माहिती घेणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच धोरणात्मक बाबींवर बोलता येईल, असेही मुंढे यांनी सांगितले.

Web Title: 120 pmp latecomers punished with without pay