
Pune : जिल्ह्यात एकाच दिवसात सव्वाशे टन कचरा जमा
पुणे : पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रदिनी (ता.१ मे) राबविण्यात आलेल्या कचरामुक्त गाव मोहिमेत एकाच दिवसात १२५ .८२ मेट्रिक टन कचरा जमा झाला आहे. जमा झालेला कचरा हा कचरा प्रक्रिया केंद्रांकडे पाठविण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये जमा झालेल्या या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी मंगळवारी (ता.२) सांगितले.
जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यात कचरामुक्त गाव ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरवात महाराष्ट्रदिनी करण्यात आली. या मोहिमेत पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील गावांमधून श्रमदानाद्वारे हा कचरा जमा करण्यात ग्रामस्थ, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. या मोहिमेत गावांच्या परीसरातील, रस्त्याच्या कडेला व अडगळीच्या ठिकाणी वर्षानुवर्षे साठलेला कचरा आणि प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गावस्तरावर कचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. या केंद्रांवर हा जमा झालेला कचरा पाठविण्यात आला असून, तेथे त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
दरम्यान, कचरामुक्त गाव मोहिमेबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून गावात कायमस्वरूपी सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. गावस्तरावर वर्दळीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, दुकाने, बाजार आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा साठलेला असतो.
उघड्यावर साठलेल्या या कचऱ्यामुळे सार्वजनिक आरोग्यास व पर्यावरणास धोका पोहोचतो. तसेच गावात दृष्यात्मक स्वच्छता दिसून येत नाही, यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ही कचरामुक्त गाव मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, खराबवाडी आणि नाणेकरवाडी या तीन ग्रामपंचायतींना भेट देऊन गावातील स्वच्छतेचा आढावा घेतला. या ग्रामपंचायतींमध्ये एमआयडीसीच्या हद्दीबाहेर सुमारे ३०० हून अधिक मोठ्या खासगी कंपन्या कार्यरत आहे. यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने कामगार राहतात.
कचरामुक्त गाव मोहीम दृष्टीक्षेपात...
- जिल्ह्यातील १३८५ गावांमध्ये मोहिमेची अंमलबजावणी
- या मोहिमेत ग्रामस्थ, महिला, पुरुष, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग.
- लोकसहभाग आणि श्रमदानातून कचऱ्याचे संकलन.
- जिल्ह्यातील ७६५ गावांनी सादर केले अहवाल.
- जिल्ह्यातून ८९ हजार ३०२ नागरिकांचा सहभाग
- मोहिमेच्या यशस्वितेसाठी जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत नियोजन.
- सरपंच, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी आणि बिडीओंकडून अंमलबजावणी.
मोहिमेत गावस्तरावरावर केलेली कार्यवाही
- श्रमदानाद्वारे रस्ते, गटारे, नाले सफाई व कचरा संकलन
- स्वच्छता साहित्य वाटपात कुटुंब, सार्वजनिक कचराकुंडी वाटप व स्वच्छता उपकरणे वाटप
- स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंजूर घनकचरा प्रकल्पांची सुरवात
- पूर्ण झालेल्या घनकचरा प्रकल्पांचे लोकार्पण
सीईंओंचे गावांना आवाहन
- स्त्याच्या बाजूने कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणी कचराकुंडी ठेवा.
- स्त्याच्या कडेला बांबू आणि टाकाऊ पिशव्यांपासून बनवलेले डस्टबिन बसवा.
- गावातील कचरा संकलन आणि कचरा प्रक्रियेसाठी बाह्य यंत्रणांची मदत घ्या.
- कचरा निर्माण होत असलेल्या ठिकाणीच कचऱ्याचे वर्गीकरण करा. (उदा. कुटुंब, सार्वजनिक ठिकाणे)
- सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील प्रत्येक घरासमोर कचरा संकलन वाहन पोहोचण्याचे नियोजन करावे.
- बस आणि दूध संकलन वाहनांप्रमाणेच कचरा संकलन वाहनांसाठी वेळेसह मार्ग निश्चित करावा.
- नियमितपणे लोक जमत असलेला परिसर स्वच्छ ठेवावा.
- सार्वजनिक ठिकाणांची दैनंदिन व वेळोवेळी झाडलोट करावी.