इंदापूरातील 13 युवक-युवतींचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश

राजकुमार थोरात
रविवार, 8 एप्रिल 2018

इंदापूर तालुक्यातील 13 युवक व युवतींनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळवले असुन बारा जणांची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झाली आहे.
 

वालचंदनगर -  राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झालेल्या इंदापूर तालुक्यातील १३ युवक-युवतींचा सत्कार भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील 13 युवक व युवतींनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळवले असुन बारा जणांची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आज शनिवार (ता. 7) रोजी आयोजन करण्यात आले होते.आमदार भरणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी भरणे यांनी सांगितले की, तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडुन प्रेरणा घेवून यश मिळवणे गरजेचे आहे. तसेच युवकांनी जीवनात मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केल्यास यश नक्की मिळत असल्याचे सांगितले.यावेळी छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, गोतोंडी सरपंच शोभना कांबळे, भिगवणच्या सरपंच हेमाताई माडगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोक चोरमले, अशोक शिंदे, सागर मिसाळ, अंबादास लांडगे आदी उपस्थित होते.

सत्कारमुर्ती युवक व युवती
स्वप्नील भोंग (गोतोंडी), राजेंद्र दराडे (अकोले), अमर शेटे (गोतोंडी), तेजस मखरे (इंदापूर), कोमल रणमोडे-धुमाळ (भिगवण), हर्षदा वाघमोडे (कळस), पूजा ठवरे (वरकुटे खुर्द), विद्या शिंदे (भांडगाव), विशाल थोरात (तावशी), महेश बोंद्रे (पिलेवाडी), प्रशांत गावडे (कडबनवाडी), विशाल नाझीरकर (पिलेवाडी) व सेन्ट्रल बँकेच्या कृषी विभागामध्ये निवड झालेल्या प्रवीण बिबे (गोतोंडी) यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होवून उज्वल यश मिळवू शकतात. पालकांनी त्यांच्या शालेय गरजा पूर्ण करण्याची गरज असल्याचे मत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रंमाक पटकवलेल्या विशाल थोरात यांनी व्यक्त केले. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: 13 youths from Indapur success in the UPSC examination