लोणावळ्यात 24 तासांत 285 मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

लोणावळा : लोणावळा परिसराला रविवारी जोरदार पावसाने तडाखा दिल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सोमवारी (ता.16) सकाळी आठ वाजेपर्यंत 285 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

टाटांच्या लोणावळा धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने डक्‍ट लाईनमार्गे 725 क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. लोणावळा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या तुंगार्ली धरण तसेच टाटाच्या वळवण धरणाचा विसर्ग थांबविण्यात आल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली असून ओढे-नाल्यांना पाणी आले आहे. कार्ला, मळवली, वेहेरगाव, वाकसई आदी ग्रामीण भागातील सोसायट्यांना पाण्याचा वेढा दिल्याने नागरिकांचे हाल झाले.

पावसाने झोडपल्याने लोणावळ्यातील निसर्गनगरी, गवळीवाडा एसटी स्टॅंड परिसर, तुंगार्लीतील बद्रीविशाल सोसायटी, नारायणी धाम परिसर, वळवण उड्डाणपूल, भांगरवाडी, नांगरगाव येथील जाधव कॉलनी, नेताजीवाडी, खंडाळा तसेच पुणे-मुंबई महामार्गावर पुन्हा एकदा पावसाचे पाणी साचले होते.

गेले आठवडाभर लोणावळा परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले असून पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

दरम्यान कार्ला फाटा ते वेहेरगाव रस्ता पुन्हा पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले. लोणावळा शहरातील काही भागात पावसाचे पाणी साचत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. 

लोणावळ्यात झाडे कोसळली, बत्ती गुल 
तुंगार्लीतील जाखमाता उद्यान, बेव्हर्ली हिल्स खंडाळा, रायवूड येथील वुडलँड हॉटेलजवळ जोरदार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. झाडे महावितरणच्या वीजवाहक तारांवर कोसळल्याने लोणावळा परिसरातील बत्ती रात्रभर गुल झाली होती. मुसळधार पावसाने हैराण झालेल्या लोणावळेकरांचे वीज बंद झाल्याने हाल झाले. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वीज पूर्ववत झाली.