14 पालख्यांनी घेतले दौंडच्या विठूरायाचे दर्शन

प्रफुल्ल भंडारी 
सोमवार, 23 जुलै 2018

दौंड शहर व परिसरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दौंड व बारामती तालुक्यातील एकूण 14 ग्रामदैवतांच्या पालख्या मंगलमय वातावरणात दाखल झाल्यानंतर शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

दौंड (पुणे) : दौंड शहर व परिसरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दौंड व बारामती तालुक्यातील एकूण 14 ग्रामदैवतांच्या पालख्या मंगलमय वातावरणात दाखल झाल्यानंतर शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या दौंड शहरातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आज (ता. 23) पहाटे श्री विठ्ठल, राही व रखुमाई यांच्या मूर्त्यांचा इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.  सुधीर गटणे व कुटुंबीय यांनी पूजा केली तर प्रितम राजहंस यांनी पौराहित्य केले. दौंड व बारामती तालुक्यातील 14 पालख्यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे-पाटील, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे-पाटील यांनी प्रथेप्रमाणे कुरकुंभ मोरी परिसरात करून पूजन केले.

कुरकुंभ (श्री फिरंगाई माता), गिरीम (श्री भैरवनाथ), गोपाळवाडी (श्रीनाथ म्हस्कोबा), जिरेगाव (श्री भैरवानाथ), मळद (श्री भैरवानाथ), माळवाडी (श्री म्हसोबा),  मसनेरवाडी (श्री म्हसकोबानाथ), येडेवाडी (श्री बिरोबा), खोरवडी (श्री तुळजा भवानी माता), पांढरेवाडी (श्री काळभैरवनाथ), शिर्सुफळ (ता. बारामती - श्री शिरसाई माता) ,  मेरगळवाडी (श्री भैरवनाथ),  भोळोबावाडी (श्री भोळोबा) व कौठडी (श्री भैरवनाथ) येथील पालख्या वाजत - गाजत दाखल झाल्या. सजविलेल्या बैलगाडीवरील वाद्यपथक, ढोल-ताशा व झांज पथकांच्या तालावर भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. 

हुतात्मा चौकात नगराध्यक्षा शीतल कटारिया, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात व पदाधिकार्यांनी पालख्यांचे स्वागत केले. पालखी मार्गावर पालख्यांमधील देवी-दैवतांचे दर्शन घेण्यासाठी शहर व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. 14 ग्रामदैवतांच्या पालख्यांसह शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांची पालखी दुपारी भीमा नदीवर स्नान करून गाव वेशीतून श्री भैरवनाथ मंदिरामार्गे श्री विठ्ठल मंदिरात दर्शनार्थ दाखल झाल्या. `पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, `ग्यानबा-तुकाराम व 'चांगभले' असा जयघोष करीत पालख्या परतीच्या प्रवासाला रवाना झाल्या.

शहरातील रोटरी सर्कल पासून सहकार चौक, शालीमार चौक, वाल्मिकी मंदिर, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी चौक, महात्मा गांधी चौक, भाजी मंडई, भैरवनाथ गल्ली या पालखी मार्गावर शहरातील विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीने पालखी समवेत आलेले वारकरी आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी फराळाचे पदार्थ व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: 14 Palkhis take darshan in Daunds vitthal mandir