दिव्यात 80 जणांची 15 कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

सासवड - दिवे (ता. पुरंदर) येथे स्वस्तात व एकावर एक फ्लॅट मोफत देतो, अशी जाहिरात करून ८० ते ९० जणांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद निशा बालाजी कोटगिरे (वय ६२, रा. दत्तनगर, जांभूळवाडी मार्ग, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सासवड पोलिस ठाण्यात कागदपत्रांसह दाखल केली. यातील संशयित आरोपी व या प्रकल्पाचे बिल्डर संतोष दत्तात्रेय सपकाळ (रा. कोरेगाव पार्क, पुणे) व पंकज अमृतलाल नवलाखा (रा. बिबवेवाडी, पुणे) आणि व्यवस्थापकासह १७ जणांविरुद्ध दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सासवड - दिवे (ता. पुरंदर) येथे स्वस्तात व एकावर एक फ्लॅट मोफत देतो, अशी जाहिरात करून ८० ते ९० जणांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद निशा बालाजी कोटगिरे (वय ६२, रा. दत्तनगर, जांभूळवाडी मार्ग, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सासवड पोलिस ठाण्यात कागदपत्रांसह दाखल केली. यातील संशयित आरोपी व या प्रकल्पाचे बिल्डर संतोष दत्तात्रेय सपकाळ (रा. कोरेगाव पार्क, पुणे) व पंकज अमृतलाल नवलाखा (रा. बिबवेवाडी, पुणे) आणि व्यवस्थापकासह १७ जणांविरुद्ध दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, सासवड ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश पोळ, अजित माने यांच्याकडे तपास आहे.  

फिर्यादीत म्हटले आहे, की दिवे येथील आरटीओ ऑफिससमोरील गट क्रमांक २०२ मध्ये ९ एकर क्षेत्र बिल्डर संतोष दत्तात्रेय सपकाळ व पंकज अमृतलाल नवलाखा यांनी स्वतःचे आहे, असे दाखवून त्यावर सुमेर लॅंड डेव्हलपर्सच्या नावाच्या बांधकाम संस्थेच्या वतीने २०१३ मध्ये तीन बिल्डिंग बांधत असून, त्यातील फ्लॅट स्वस्त व एका फ्लॅटवर एक फ्लॅट मोफत देण्याचेही आमिष दाखविले. त्यातून केलेल्या जाहिरातीच्या आमिषाला बळी पडून २०१५ मध्ये फिर्यादी निशा कोटगिरे यांनी २२ लाख ८७ हजार रुपयांना ठरलेल्या फ्लॅटपोटी सुमारे ११ लाख ४२ लाख रुपये वेळोवेळी बिल्डरला दिले. 

‘‘तसेच त्याचवेळी ॲग्रिमेंटसह खरेदीखत करून दिले. मात्र त्या वेळी बिल्डिंग बांधली नव्हती व आजही एका बिल्डिंगचा पाया खोदण्यापलीकडे कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे पहिली फिर्याद कोटगिरे यांनी पोलिसांकडे दाखल केली. त्यानंतर आता तक्रारदारांची रीघ सुरू झाली आहे. यात किमान ८० ते ९० जणांची सुमारे १५ कोटी रुपये जमवून त्यांना फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली आहे. शिवाय या रकमेचा अपहार केला आहे. फसविले गेलेले लोक येतील, तशी ही फसवणूक अजून वाढण्याची शक्‍यता आहे,’’ अशी माहिती राजेश पोळ यांनी दिली. कलम ४२० नुसार फसवणूक, कलम ४०६ नुसार रकमेचा अपहार असा गुन्हा दाखल झाला आहे.  

खोरनंतरही पुन्हा फसवणूक
खोर येथे यापूर्वी या प्रकरणातील बिल्डरने प्लॉटिंग केले होते. तिथेही पैसे घेऊन लोकांना प्लॉट दिले नाहीत. तिथे फसवणूक झालेल्या काही लोकांना दिवे येथे फ्लॅट देतो, असे सांगून या बिल्डरने पुन्हा फसवणूक केल्याचेही यानिमित्ताने फिर्यादींच्या सांगण्यानुसार स्पष्ट झाले आहे.

Web Title: 15 crore frauds in saswad