15 दिवसांत 454 कुत्री ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे : विविध उपाययोजना करूनही शहरातील भटक्‍या कुत्र्यांची समस्या सुटत नसल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी प्रभागनिहाय पाहणी करून त्यांना ताब्यात घेण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील 15 दिवसांमध्ये साडेचारशे भटकी कुत्री ताब्यात घेण्यात आली असून, त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये 41 प्रभागांमध्ये महापालिकेची पथके कारवाई करणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात कोथरूड आणि येरवडा या भागातून सुमारे 454 भटकी कुत्री ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यासाठी वाहने आणि पुरेशा कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसारही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

शहर आणि उपनगरांमध्ये भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतरच दखल घेऊन केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई होत आहे. कात्रजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना चावा घेतल्याच्या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या कारभाराकडे बोट दाखविण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर आता भटक्‍या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी प्रभागनिहाय मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. यामुळे गल्लीबोळातील कुत्र्यांना ताब्यात घेणे शक्‍य होणार आहे. 

सर्व प्रभागांतील कुत्री ताब्यात घेऊन त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये वाहनांची व्यवस्था केली आहे. या मोहिमेअंतर्गत नेमकी कारवाई व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. पुढील दीड-ते दोन महिने ही मोहीम सुरू राहणार असून, अधिकाधिक भटकी कुत्री ताब्यात घेण्यात येतील. 
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख, महापालिका 

Web Title: In 15 days, the catch of 454 dogs