चेन्नई-कुर्ला एक्‍स्प्रेसमधून 15 किलो सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - लोहमार्ग पोलिसांनी चेन्नई-कुर्ला एक्‍स्प्रेसच्या बोगीतील दोन प्रवाशांकडून 15 किलो 560 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. त्याची किंमत चार कोटी 38 लाख रुपये इतकी असून, पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

पुणे - लोहमार्ग पोलिसांनी चेन्नई-कुर्ला एक्‍स्प्रेसच्या बोगीतील दोन प्रवाशांकडून 15 किलो 560 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. त्याची किंमत चार कोटी 38 लाख रुपये इतकी असून, पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई-कुर्ला एक्‍स्प्रेस सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुणे स्थानकावर आली. त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी एसी बोगीतून प्रवास करणाऱ्या दोन संशयितांकडे चौकशी केली. त्यावेळी राजस्थान येथील सुमेर मुकन सिंह आणि हरिओम पुरुषोत्तम पारिख यांच्याकडे 15 किलो 560 ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले. परंतु त्यांच्याकडे या दागिन्यांबाबत अधिकृत कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी हे दागिने जप्त केले असून, संबंधित सोने मालकास चौकशीसाठी बोलावले आहे. 

या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला कळविले आहे. सोन्याचे दागिने कोठून आणले, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, उपविभागीय अधिकारी तुकाराम वहिले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, सहायक निरीक्षक हिम्मत माने पाटील, बाबासाहेब ओंबासे, संतोष लाखे, मिलिंद आळंदे, भीमाशंकर बमनाळीकर, गणेश शिंदे, कैलास जाधव आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: 15 kg gold seized from the Chennai-Kurla Express