Vidhan Sabha 2019 : दौंड विधानसभा मतदारसंघात पैसेवाटप, दीड लाख जप्त

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

दौंडमध्ये पैसे वाटताना सहा जण ताब्यात 

दौंड : मतदारांना पैसे वाटणाऱ्या सहा जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दौंड उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी केलेल्या या कारवाईत दीड लाख रुपये जप्त केले.

माजी नगरसेवक नागसेन बाबूराव धेंडे, भारत विठ्ठल सरोदे, गौरव राजेंद्र सरनोत, अक्षय प्रकाश होशमनी, रोहित रवींद्र ओहोळ व रितेश मारुती वाल्मीकी (सर्व रा. दौंड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

योगेश प्रकाश आढाव, अमित भास्कर आढाव व रूपेश श्‍याम खंडाळे पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी कॉन्स्टेबल गणेश कडाळे यांनी फिर्याद दिलीे. फिर्यादीत भाजप उमेदवारासाठी पैसे वाटप केल्याचे म्हटले आहे; मात्र कोणाचे नाव नाही. पोलिसांत याप्रकरणी भारतीय दंड विधान १७१ ब, १७१ ई लोकप्रतिनिधी कायदा १२३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. सरोदे हे पैसे वाटत नव्हते, तर ते त्यांच्या घरीच होते. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी घरातील पैसे नेलेले आहेत. तपासात सर्व काही निष्पन्न होईल. सरोदे हे आरपीआयचे कार्यकर्ते आहेत. मतदार त्यांच्याकडे स्लिपा घेण्यासाठी येत होते. - राहुल कुल, आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1.5 lakh seized in Daund VidhanSabha constituency