जलतरण तलावात बुडणाऱ्या १५ जणांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

प्रशिक्षकांचा पुढाकार; गर्दी वाढल्याने जीवरक्षक पडू लागले अपुरे

पिंपरी - नेहरूनगर येथील मगर जलतरण तलावावरील वाढत्या गर्दीमुळे जीवरक्षकांची संख्या अपुरी पडत आहे. यावर उपाय म्हणून जलतरण प्रशिक्षक आणि मित्रमंडळी यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत गेल्या दहा दिवसांत १५ जणांना बुडताना वाचविण्यात यश आले.   

प्रशिक्षकांचा पुढाकार; गर्दी वाढल्याने जीवरक्षक पडू लागले अपुरे

पिंपरी - नेहरूनगर येथील मगर जलतरण तलावावरील वाढत्या गर्दीमुळे जीवरक्षकांची संख्या अपुरी पडत आहे. यावर उपाय म्हणून जलतरण प्रशिक्षक आणि मित्रमंडळी यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत गेल्या दहा दिवसांत १५ जणांना बुडताना वाचविण्यात यश आले.   

दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील सर्व जलतरण तलावांवर पोहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत असते. यंदाचा उन्हाळाही त्याला अपवाद राहिलेला नाही. मगर तलावावर प्रत्येक बॅचला सरासरी २५० ते ३०० नागरिक पोहण्यासाठी गर्दी करत आहेत. शनिवारी-रविवारी गर्दी आणखी वाढत आहेत; मात्र या तलावावर जीवरक्षकांची संख्या केवळ चार आहे. सध्या मगर जलतरण तलावावर उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे भरविली जात आहेत.

त्यामुळे तेथे जलतरण प्रशिक्षकदेखील असतात. असंख्य लहान मुले आणि शिकाऊ प्रशिक्षणार्थी जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहेत. ही शिबिरे चालू असतानाच इतर सामान्य नागरिकांनाही पोहण्यासाठी सोडले जाते. त्यामुळे या जीवरक्षकांना सर्वत्र लक्ष ठेवणे अवघड होत आहे. याबाबत जलतरण प्रशिक्षक श्रीकांत चुटके म्हणाले, ‘‘मगर तलावावर पोहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. तलावाची किमान खोली तीन फूट, तर कमाल खोली सात फूटइतकी आहे. जीवरक्षकदेखील डोळ्यांत तेल घालून जागरूक राहत आहेत; परंतु गर्दीमुळे कोणती व्यक्ती बुडत आहे. हे चटकन लक्षात येत नाही. गेल्या काही दिवसांत हे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आम्हीच पुढाकार घेत बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्याचा प्रयत्न करतो. गेल्या दहा दिवसांत जवळपास १५ व्यक्तींना वाचविण्यात आम्हाला यश आले आहे.’’ 

काय करावे...
नवशिकाऊ व्यक्तींनी सुरक्षा साधनांचा वापर करावा.
पोहताना जास्त दम लागू नये, यासाठी श्‍वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
लहान मुलांना पोहण्यासाठी बेबी पूलचा वापर करावा. खोल पाण्यात जाऊ नये.
शेजारील कोणी बुडत असल्यास आरडाओरडा करून त्वरित जीवरक्षकाच्या लक्षात आणून द्यावे.

Web Title: 15 person life saving in swimming tank