वेल्हे तालुक्‍यात दीडशे कोटींची कामे - सुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

गुंजवणे - कोणतीही सत्ता नसताना वेल्हे तालुक्‍यात दीडशे कोटींची कामे केली आहेत. केलेल्या कामांची उद्‌घाटने दुसरेच करत आहेत. ज्यांना तसे करायचे त्यांना करू द्या, आपण कामाला महत्त्व द्यायचे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

गुंजवणे - कोणतीही सत्ता नसताना वेल्हे तालुक्‍यात दीडशे कोटींची कामे केली आहेत. केलेल्या कामांची उद्‌घाटने दुसरेच करत आहेत. ज्यांना तसे करायचे त्यांना करू द्या, आपण कामाला महत्त्व द्यायचे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

वेल्हे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात सुळे बोलत होत्या. या वेळी जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे, निरीक्षक वेल्हे शांताराम इंगवले, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, जिल्हा बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, वेल्हे तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष तानाजी मांगडे, किरण राऊत व तालुक्‍यातील पदाधिकारी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, ‘‘सरकारला ग्रामीण भागातील जनतेची नाळ न कळल्याने शेतकऱ्यांच्या मालाला माती मोल किंमत मिळत आहे. नोटाबंदीला आमची काहीही हरकत नाही. मात्र, पूर्व नियोजन नसल्याने चलन तुटवडा झाला. यात सर्वसामान्य जनता भरडली गेली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. महागाई काही कमी झाली नाही. कोणताही निर्णय चुकला की मागील सरकारवर दोषारोप करायचे. चांगले काम झाले की स्वतः केले सांगायचे. सध्या ज्या विकास प्रकल्पांची उद्‌घाटने होत आहेत, त्याचे श्रेय सरकार घेत आहे. हे प्रकल्प दोन वर्षांपूर्वीचे नसून, मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील आहेत. मोबाईल, आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह, औद्योगिक प्रगती हे काय आज झाले. गेल्या साठ वर्षांत हे होत आले आहे.’’

वेल्हे तालुक्‍यात सर्व गावांमध्ये वीज पोचविण्याचे काम चालू आहे. राहिलेल्या बारा गावांनादेखील लवकरच वीज मिळणार आहे. त्यासाठीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. तालुक्‍यातील रस्ते चांगले करण्यास प्राधान्य देऊन, मढे घाटाचा प्रश्न, रांजणे ते पाबे या दरम्यान बोगदा मार्गी लावण्यास प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.’’

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी सहा जागांसाठी २६ उमेदवार इच्छुक आहेत. श्रेष्ठी कोणालाही तिकीट देण्यासाठी सांगणार नाहीत वा लादणार नाहीत. जी समिती नेमली आहे ती इच्छुकांचे कार्य पाहून योग्य उमेदवारास तिकीट देतील. येथे राष्ट्रवादीचा पराभव करण्याची कोणात हिंमत नाही. राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीला पाडायचे नाही हे लक्षात ठेवा, असे आवाहनही सुळे यांनी केले. 

Web Title: 150 crore work in velhe tahsil