pune
pune

राममंदिर प्रकरणी अध्यादेशाचा मुद्दा गैरलागू : प्रकाश अकोलकर   

दौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी सर्वोच्च न्यायलयाने स्वतः हुन स्थगिती दिली नाही तरी कोणीही भारतीय नागरिक अध्यादेशाविरूध्द न्यायालयाची दारे ठोठावून स्थगिती घेऊ शकतो. त्यामुळे अध्यादेशाचा मुद्दा गैरलागू आहे, असे स्पष्ट मत `सकाळ` चे राजकीय संपादक प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले आहे.
 

दौंड शहरात जागर दीपोत्सवात `राजकीय कुंडली २०१९ ` या परिसंवादात बोलताना प्रकाश अकोलकर यांनी हे मत व्यक्त केले. वरिष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक श्रीधर लोणी व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे हे परिसंवादात सहभागी झाले होते. 

प्रकाश अकोलकर म्हणाले, ''९७७ साली पहिल्यांदा नकारात्मक मतदान झाले व इंदिरा गांधी यांचे सरकार गेले तर, १९८९ मध्ये बोफोर्स तोफांच्या मुद्द्यावर राजीव गांधी यांचे सरकार गेले. २००४ मध्ये सलग साडेसहा वर्षे सरकार असतानाही अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार गेले. २०१४ मध्ये प्रथमच सकारात्मक मतदान होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. नकारात्मक मतदान करण्याकडे आपल्या देशातील लोकांचा जास्त कौल असतो. २०१९ मध्ये नकारात्मक मतदान होणारच नाही व लोकांना पर्याय लागतोच, '' असे समजण्याचे काही कारण नाही. आगामी लोकसभेसाठी विरोधकांची आघाडी होणे कठीण असले तरी २७२ खासदारांची बेरीज होऊ शकते. 

श्रीधर लोणी म्हणाले, "आरक्षणाच्या मुद्द्याचे मूळ हे सामाजिक विषमतेत आहे. भाजपकडे साधनसामग्री व संघटनाचे जाळे आहे. २००० नंतर जन्मलेली पिढी २०१९ मध्ये प्रथमच लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. मात्र या नवमतदारांना व तरूणाईला शोभेल किंवा साद घालणारी भाषा राहुल गांधी यांच्याकडे नाही.''

वासुदेव काळे म्हणाले, ''राज्यातील दुष्काळ प्रकरणी सरकार गंभीर आहे. सक्षम विरोधक नसले तरी नरेंद्र मोदी यांची नितीमत्ता स्वच्छ असल्याने युवकांना त्यांच्यावर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बदल होणार नाही.''
दौंड मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॅा. सुनीता कटारिया, भीमथडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण बिडवे व उपाध्यक्ष गोविंदबाबू अग्रवाल यांनी स्वागत केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com