पूरस्थितीमुळे 16 जणांचा बळी; दीड लाख नागरिक सुरक्षित स्थळी

अनिल सावळे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पूरस्थितीमुळे दीड लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
- पुणे विभागात 16 जणांचा मृत्यू
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर
- पुणे जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात
- कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

पुणे : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली असून, स्थानिक प्रशासनासह लष्कर, एनडीआरएफ आणि नौदलाकडून मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे. पुणे विभागात आतापर्यंत सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अन्य काही गावांमधील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.पूरस्थितीमुळे पुणे विभागात 16 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही मार्ग आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यास अडचणी येत आहेत. कृष्णा नदीत 3 लाख 62 हजार क्‍युसेकने येवा सुरू असून, अलमट्टी धरणातून चार लाख क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग साडेचार लाख क्‍युसेक करण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे केली आहे.
वेधशाळेने कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. नागरिकांनी पाण्यात उतरू नये. सेल्फी घेण्याचे टाळावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

16 जणांचा बळी
पूरस्थितीमुळे पुणे विभागात 16 जणांचा बळी गेला आहे. त्यात पुणे जिल्ह्यात चार, सातारा सात, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन आणि सोलापूर येथील एका व्यक्‍तीचा समावेश आहे.

- पुणे विभागात एकूण 58 तालुक्‍यांपैकी 30 तालुक्‍यांत अतिवृष्टी
- पुणे विभागातील सर्व धरणे शंभर टक्‍के भरली
- एनडीआरएफची 10 पथके, प्रादेशिक आर्मी आणि नौदलाच्या 10 तुकड्यांतील जवानांकडून बचावकार्य
- पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारा पुणे-बंगळूर महामार्ग शिरोली आणि किनी-वाठारजवळ बंद
- बेळगाव येथून कोल्हापूरकडे येणारा महामार्ग कागलजवळ वाहतुकीस बंद
- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी एसटी वाहतूक बंद
- पुणे जिल्ह्यात पाणी ओसरलेल्या ठिकाणी एसटी वाहतूक सुरू करणार
- कोयनेतून विसर्ग कमी, कराडमध्ये चार फुटांनी पाणी ओसरले. साताऱ्यात स्थितीमध्ये सुधारणा
- उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर तालुक्‍यात पूरस्थिती
- पुणे जिल्ह्यात 34 पूल तर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत तीन पूल पाण्याखाली
- सातारा जिल्ह्यात आठ पूल, कोल्हापूर जिल्ह्यात 89 तर सांगली जिल्ह्यात 27 रस्ते पाण्याखाली

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 deaths of floods and 1.5 lakh citizens moved safe places