तरुणांकडून १६ गाड्यांची तोडफोड

तरुणांकडून १६ गाड्यांची तोडफोड

पुणे/वारजे - गुन्हेगारवरील खुन्नस काढण्यासाठी तीन तरुणांनी सोमवारी पहाटे अडीच वाजता कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीमध्ये तब्बल १६ गाड्या फोडल्या. त्यामध्ये १३ कारसह टेम्पो, दुचाकींचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

महेश महाडिक (वय २४) व हर्षल कंधारे (वय २३, दोघेही रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी दत्तात्रय विदुर डोंगरे (वय ५४) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडिक याचे स्थानिक परिसरातील एका गुन्हेगाराबरोबर वाद आहेत. त्याच्यावर खुन्नस काढण्यावरून महाडिक, कंधारे व त्यांचा साथीदार सोन्या याने सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास परिसरात राहणाऱ्या नागरिकांची रस्त्याच्याकडेला लावलेली वाहने फावडे, टिकाव व कोयत्याच्या सहाय्याने फोडण्यास सुरवात केली. गाड्या फोडण्याचा आवाज व तिघांच्या आरडाओरड्याने नागरीक जागे झाले. फिर्यादी घराबाहेर आले त्या वेळी तिघेजण त्यांची कार फोडत होते. स्थानिक नागरिकांना महाडिक व कंधारेनी मारून टाकण्याची धमकी दिली. 

रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. बीट मार्शल येईपर्यंत तिघेही पळून गेले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणाचा आधार घेऊन वारजे माळवाडी पोलिसांनी महाडिकला अटक केली. तर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कंधारे यास अटक केली. दरम्यान, त्यांचा साथीदार सोन्या याचा पोलिस शोध घेत आहेत.

नागरिकांमध्ये घबराट
मागील आठवड्यात हडपसर परिसरात, तर शनिवारी वारजे येथील म्हाडा कॉलनीमध्येही गाड्यांच्या तोडफोडीची घटना घडली होती. त्यानंतर कर्वेनगरमध्येही त्याची पुनरावृत्ती झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ‘‘आम्ही कर्ज काढून गाडी घेतली होती. गाडीचे हफ्तेही अद्याप फिटलेले नाहीत. तोपर्यंत आमची गाडी फोडली, आता गाडी दुरुस्त करण्याचा खर्च कसा करणार ? सर्वसामान्य नागरिकांनी वाहनेच वापरू नयेत का ? ’’ असा संतप्त सवाल एका नागरिकाने उपस्थित केला.

पोलिसांच्या  कारवाईकडे लक्ष
दुचाकी, चारचाकी वाहने फोडण्याच्या, जाळण्याच्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत. त्यामध्ये सर्वसामान्यांचेच नुकसान होत आहे. अशा घटना घडविणाऱ्यांना कायमस्वरुपी जरब बसेल, यादृष्टीने पोलिस पावले उचलतील काय ? असाही प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com