आरोग्य खात्यातून 17 डॉक्‍टर रुजू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

निवासी डॉक्‍टरांची सामूहिक रजा चार दिवसानंतरही सुरू

निवासी डॉक्‍टरांची सामूहिक रजा चार दिवसानंतरही सुरू
पुणे - ससून रुग्णालयातील रुग्णांवर उपचारासाठी आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातून 17 डॉक्‍टर गुरुवारी रुजू झाले आहेत. त्यामुळे विस्कळित झालेली रुग्णसेवा काही अंशी सुरळीत होईल आणि कामावर असलेल्या डॉक्‍टरांना थोडी उसंत मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या मागणीसाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टर सोमवारपासून बेमुदत रजेवर गेले आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत हा संप मागे घेण्यात आला नव्हता. सामूहिक रजा घेतल्याने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील 490 पैकी 272 निवासी डॉक्‍टरांना महाविद्यालय प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. त्यानंतरही हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार निवासी डॉक्‍टरांनी घेतला. त्याचा थेट परिणाम महाविद्यालयाशी संलग्न "ससून'च्या रुग्णसेवेवर होऊ लागला. रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. रुग्ण तपासण्यांची संख्या कमी झाली आहे. वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील काही डॉक्‍टरांना रुग्णसेवेसाठी ससून रुग्णालयात पाठविण्याची विनंती प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी केली. त्याला आता या संस्थांकडून प्रतिसाद मिळत आहे.

याबाबत डॉ. तांबे म्हणाले, 'निवासी डॉक्‍टर कामावर रुजू न झाल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत "जैसे थे' स्थिती होती. या दरम्यान, वेगवेगळ्या संस्थांमधून 17 डॉक्‍टर गुरुवारी संध्याकाळपर्यंत "ससून'मध्ये रुग्णसेवेसाठी रुजू झाले आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर पडलेला ताण काही अंशी कमी होईल. त्यापैकी सात डॉक्‍टर विशेषज्ञ आहेत. त्यामुळे मंदावलेली रुग्णसेवा गतिमान करण्यास मदत होईल.'

Web Title: 17 doctor ready in sasoon hospital