जेजुरीतील मर्दानी दसरा सोहळ्यात चित्तथरारक कसरती

jejuri dussehra festival
jejuri dussehra festival

जेजुरी : सनई- चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. या उत्सवाची सतरा तासानंतर सांगता झाली. उत्सव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाला व बुधवारी सकाळी अकरा वाजता गडावर तलवार उचलण्याच्या स्पर्धेनंतर संपला.

पेशव्यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता इशारा देताच पालखी सोहळा सुरू झाला. भाविकांनी सज्जावरून पोत्याने पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली. पालखी मुख्यद्वारातून रमणा परिसराकडे मार्गस्थ झाली. या वेळी देवसंस्थानचे मुख्य विश्‍वस्त ऍड. अशोक संकपाळ, विश्‍वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, तुषार सहाणे, ऍड. प्रसाद शिंदे, खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदी उपस्थित होते. 

कडेपठारावरील खंडोबाचा पालखी सोहळा रात्री नऊ वाजता सुरू झाला. सुसरटिंगीवरून दोन्ही पालख्या दिसल्यानंतर रमणाकडे दोन्ही पालख्या मार्गस्थ झाली. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कडेपठारच्या डोंगरातील रमणा परिसरात आरशामध्ये दोन्ही पालख्यांची भेटाभेट झाली. त्यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर गडावरची पालखी जुनी जेजुरीमार्गे शहरात आली. नगरपालिकेच्या पटांगणातील रावणाचे दहन करण्यात आले. त्यानंतर नंदी चौकात धनगर समाज बांधवांनी ओव्या म्हणत लोकर उधळली. 

कडेपठारच्या पालखीबरोबरच्या भाविकांना खाली उतरण्यासाठी या वेळी देवसंस्थानच्यावतीने दोर लावले होते. दोर धरून भाविक खाली उतरत होते. त्यामुळे घसरण्याचा धोका टळला. देवसंस्थानने विजेची सोय केली होती. महाद्वार रस्त्यावर पालखीचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी रांगोळी काढल्या होत्या. गडावर कलावतांनी पालखी पुढे हजेरी लावली. देवसंस्थानच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. रोजमारा वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली. मार्तंड देवसंस्थानच्यावतीने मानकऱ्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. 

पालखी गडावर आल्यानंतर तलवार उचलण्याची स्पर्धा घेण्यात आली. एका हाताने तलवार उचलून धरणे व कसरत, अशा दोन प्रकारच्या स्पर्धा होत्या. एकूण 46 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. माजी विश्‍वस्त सुधीर गोडसे, सोमनाथ उबाळे, कृष्णा कुदळे व जालिंदर खोमणे यांनी पंच म्हणून काम पाहिले. दोन्ही प्रकारातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे एकवीस हजार, पंधरा हजार व अकरा हजार; तर उत्तेजनार्थसाठी प्रत्येकी पाच हजार व गौरव चिन्हे देऊन सन्मान करण्यात आला. 

तलवार स्पर्धेत शेरे, कुदळे प्रथम 
एका हाताने तलवार उचलून धरण्याच्या स्पर्धेत रमेश दत्तात्रेय शेरे (17 मिनीट 13 सेकंद) यांनी प्रथम, मंगेश चव्हाण (5 मिनीट 38 सेकंद) याने द्वितीय; तर हेमंत माने (5 मिनीट 30 सेकंद) याने तृतीय क्रमांक मिळविला. अक्षय खोमणे (2 मिनीट 54 सेकंद) व विजय कामथे (2 मिनीट 31 सेकंद) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तलवार कसरतीच्या स्पर्धेमध्ये सचिन शिवाजी कुदळे, शिवाजी माणिक राणे व नितीन शिवाजी कुदळे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. विशाल माने व अक्षय गोडसे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com