पुणे जिल्ह्याला पावणेदोन लाख टन खते

Fertilizer
Fertilizer

पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन मंजूर झाला आहे.

खरिपासाठीची खते व बियाणे तालुकानिहाय मंजूर कोट्यानुसार प्रत्येक तालुक्‍यात वितरित केलीली आहेत. शिवाय, रब्बी हंगामातील खतांचा साठाही शिल्लक आहे. यामुळे यंदा जिल्ह्यातील खरीप हंगामात खते व बियाण्यांचा तुटवडा भासणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामात युरिया खतास मोठी मागणी असते, त्यामुळे या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून किमतीपेक्षा अधिक भावाने त्याची विक्री करण्याच्या घटना जिल्ह्यात याआधी घडल्या होत्या. त्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, या उद्देशाने पुरेशा प्रमाणात युरिया खताची उपलब्धता करण्यात आलेली आहे. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र २ लाख ३१ हजार हेक्‍टर आहे. सरकारने मंजूर केलेल्या रासायनिक खतांमध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आणि संयुक्त खतांचा समावेश आहे.  

दरम्यान, संकरित ज्वारीचे ७७ क्विंटल बियाणे, संकरित बाजरी - १ हजार २९७ क्विंटल, सुधारित बाजरी - ४३२ क्विंटल, भात (तांदूळ) ः १३ हजार क्विंटल, मका - १ हजार ८८८ क्विंटल, भुईमूग - १ हजार २६५, सोयाबीन - ६ हजार १९१, तूर - ११८, मूग - २७८, उडीद - ११२, वाटाणा - ७१० आणि तागाचे ६०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आवश्‍यक ती पूर्वतयारी केली आहे. मागणीच्या प्रमाणात खते आणि बियाण्यांची उपलब्धता करून दिली आहे. यामुळे खरिपासाठी खते व बियाण्यांची कमतरता पडणार नाही. शिवाय, खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून, त्यांची जादा भावाने विक्री करणाऱ्या खते व बियाणे विक्रेत्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. 
- सुनील खैरनार, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com