येडगावात 18 लाख किलोवॉट वीज

रवींद्र पाटे
सोमवार, 21 मे 2018

नारायणगाव - कुकडी पाटबंधारे विभागाने रब्बी व उन्हाळी हंगामात शेती सिंचनासाठी कुकडी डावा कालव्यात सोडलेल्या ६.३७ टीएमसी पाण्याचा वापर मे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज कंपनीने वीजनिर्मितीसाठी करून दोन आवर्तनात अठरा लाख किलोवॉट वीजनिर्मिती केली आहे. या प्रकल्पाद्वारे कुकडी पाटबंधारे विभागाला ९१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

नारायणगाव - कुकडी पाटबंधारे विभागाने रब्बी व उन्हाळी हंगामात शेती सिंचनासाठी कुकडी डावा कालव्यात सोडलेल्या ६.३७ टीएमसी पाण्याचा वापर मे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज कंपनीने वीजनिर्मितीसाठी करून दोन आवर्तनात अठरा लाख किलोवॉट वीजनिर्मिती केली आहे. या प्रकल्पाद्वारे कुकडी पाटबंधारे विभागाला ९१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

या बाबत कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता जे. बी. नन्नोर व उपअभियंता बाळकृष्ण सावंत म्हणाले, ‘‘२.८ टीएमसी उपयुक्त पाणी साठवणक्षमता असलेल्या येडगाव धरणाचे काम मे १९७७ मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी ९ कोटी ३० लाख रुपये खर्च आला होता. मागील तीस वर्षे प्रकल्पातील पाण्याचा उपयोग केवळ शेती सिंचन व बिगर सिंचनासाठी करण्यात येत होता. सिंचनासाठी कालव्यात सोडलेल्या पाण्याचा वापर जलविद्युत निर्मितीसाठी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी ३ मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम बीओटी तत्त्वावर मुंबई येथील मे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज कंपनीला देण्यात आले होते. अनेक अडथळे पार करत प्रकल्पाचे काम १४ डिसेंबर २०१७ रोजी पूर्ण झाले. १५ डिसेंबर २०१७ रोजी रब्बीचे आवर्तन प्रथमच जलविद्युत विमोचीकेद्वारे कुकडी डावा कालव्यात शेती सिंचनासाठी सोडून जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. रब्बीच्या आवर्तनात सोडण्यात आलेल्या ५.६४ टीएमसी पाण्याचा पुनर्वापर करून १५.७२ लाख किलोवॉट वीजनिर्मिती करण्यात आली. त्यानंतर १७ मे २०१८ पासून कालव्यात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. उन्हाळी आवर्तनात आजअखेर सोडण्यात आलेल्या ०.७३ टीएमसी पाण्याच्या पुनर्वापराद्वारे २.४३ लाख किलोवॉट वीज निर्मिती करण्यात आली.’’

दुहेरी लाभ 
या हंगामातील दोन आवर्तनात सोडण्यात आलेल्या पाण्याचा वापर करून तयार झालेली १८.१५ लाख किलोवॉट वीज मे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज कंपनीने वीज कंपनीच्या आळे येथील उपकेंद्राला दिली आहे. 

जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेती सिंचन व जलविद्युत निर्मिती असा दुहेरी उत्पन्नाचा लाभ पाटबंधारे विभागाला झाला आहे. हा प्रकल्प खासगीकरणातून पूर्ण करण्यात आला आहे.’’

Web Title: 18 lakh kilowatt electricity