नागापुरातून १८ तोळे सोने पळविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

निरगुडसर - आजी व नातू घरी एकटे असल्याची संधी साधत चोरट्यांनी नागापूर (ता. आंबेगाव) येथील घर फोडून १८ तोळे सोने व रोख २० हजार रुपये पळवून नेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.

निरगुडसर - आजी व नातू घरी एकटे असल्याची संधी साधत चोरट्यांनी नागापूर (ता. आंबेगाव) येथील घर फोडून १८ तोळे सोने व रोख २० हजार रुपये पळवून नेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.

नागापूर गावापासून काही अंतरावरील वळती फाट्यानजीक राजू शिंदे यांचे घर आहे. राजू व त्यांचे वडील बाहेरगावी गेले होते. घरी गोदाबाई शिंदे (वय ६५) व त्यांचा नातू पारस राजू शिंदे (वय १२) हे दोघेच होते. सोमवारी पहाटे चार चोरट्यांनी शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जागे झालेल्या गोदाबाई यांनी घराला आतून आणखी दोन कड्या लावल्या. परंतु, चोरट्यांनी जोरात धडक देत दरवाजा तोडला. काळी हाफ पॅंट, जर्किंग व टोपी घातलेल्या चौघांनी गोदाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. कानातील कुड्या व वेल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गोदाबाई यांनी कान तुटेल असे सांगून स्वतःच कुड्या काढून दिल्या. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील समान अस्ताव्यस्त केले. पत्र्याची पेटी तोडून त्यातील मोहनमाळ, बोरमाळ, लक्ष्मीहार, चैन, नथ, अंगठ्या, बांगड्या असे एकूण १८ तोळे सोने व २० हजार रुपये रोख असा ऐवज पळवून नेला. 

पोलिस पाटील संजय पोहकर यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. फौजदार अर्जुन शिंदे यांनी ठसेतज्ज्ञ व श्‍वान पथकास पाचारण केले. मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनीही शिंदे कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केली असल्याचा संशय असून, या घटनेचा त्वरित तपास लावावा अशी मागणी उपसरपंच सुनील शिंदे यांनी केली.

तपासासाठी पथके रवाना
खेड उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांनी नागापूर (ता. आंबेगाव) येथे शिंदे कुटुंबीयांची भेट घेऊन पाहणी केली. ते म्हणाले, चोरीच्या तपासासाठी नारायणगाव, शिरूर आदी परिसरात पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच चोरट्यांना गजाआड केले जाईल.

Web Title: 18 tolas gold loot from Nagapur in pune district