चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 18 मे 2018

जुन्नर (पुणे) : येथील माजी पोलीस पाटील मारुती भिमाजी डोके (वय 63 रा. परदेशपुरा जुन्नर) यांना ता. 21 फेब्रुवारी 2018 ला घरात आलेल्या साधूच्या वेशातील दोघांनी खडीसाखरेचा प्रसाद देऊन गुंगविले व घरातील 2 लाख 50 हजाराची रोकड लंपास केली होती.

जुन्नर (पुणे) : येथील माजी पोलीस पाटील मारुती भिमाजी डोके (वय 63 रा. परदेशपुरा जुन्नर) यांना ता. 21 फेब्रुवारी 2018 ला घरात आलेल्या साधूच्या वेशातील दोघांनी खडीसाखरेचा प्रसाद देऊन गुंगविले व घरातील 2 लाख 50 हजाराची रोकड लंपास केली होती.

त्यांनी घरगुती कामाकरता पैशाची गरज असल्याने राजगुरूनगर बँकेच्या जुन्नर शाखेत सोने तारण ठेऊन तसेच इतर नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन घरात 2 लाख 50 हजार रुपये रोख ठेवले होते. सायंकाळी  सहाच्या सुमारास दोन भगवे वस्त्र घातलेले इसम त्यांच्या घरी आले. आम्ही त्रंबकेश्वर येथून आलो आहोत व आता भीमाशंकरला चाललो आहोत असे सांगितले. तसेच त्यांनी प्रसाद म्हणून खडी साखर दिली. त्यानंतर झोप लागली. सकाळी उठलो तेव्हा आमच्या घरातील 2 लाख 50 हजाराची रक्कम चोरीस गेली असल्याचे आढळून आले. याबाबत ता.23 रोजी जुन्नर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. 

या गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस नाईक चासकर,पोलीस हवालदार खेडकर, पोलिस शिपाई गायकवाड, यांच्या पथकाने परिसरातील सी.सी.टी.व्ही. व मोबाईल लोकेशनच्या मदतीने तपास करून गुन्हा उघडकीस आणला.यातील आरोपी अशोक फकिरा चव्हाण (वय 32), संतोष साहेबराव देवकर (वय. 45, दोघे रा. जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली जि. पुणे) यांना अटक करून त्यांनी चोरून नेलेल्या रक्कमे पैकी 1 लाख, 60 हजाराची रक्कम त्यांच्याकडून जप्त केली. या आरोपींनी अशा प्रकारचे अन्य काही गुन्हे केले किंवा कसे केले याबाबत अधिक चौकशी करत असल्याचे दिवटे यांनी सांगितले.

Web Title: 2 arrested for robbery in junnar pune