"नीट'साठी जिल्ह्यातून 20 हजार विद्यार्थी 

neet
neet

पुणे - देशभरातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय (एमबीबीएस/बीडीएस) अभ्यासक्रमासाठीच्या जवळपास 95 हजार जागांसाठी येत्या रविवारी (ता.6) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) होणार आहे. देशभरातील जवळपास 12 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, त्यातील अडीच लाख विद्यार्थी हे महाराष्ट्रातील असतील. पुणे जिल्ह्यातून जवळपास 20 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेचा निकाल 5 जून रोजी जाहीर होणार आहे. 

या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सरकारी, खासगी वैद्यकीय महाविद्यालये, अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो. अकरावी आणि बारावी विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होते. या परीक्षेची काठिण्यपातळी जास्त असते. विद्यार्थ्यांनी शक्‍यतो अचूक उत्तरे सोडविण्याचा प्रयत्न करावा. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असल्यामुळे मर्यादित वेळेचे भान ठेवून प्रश्‍न सोडवावेत, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे. 

* पेपरमधील प्रश्‍नांचे स्वरूप आणि त्यासाठी अपेक्षित कालावधी 
विषय : प्रश्‍नांची संख्या : कालावधी 
- जीवशास्त्र : 90 प्रश्‍न : 45 मिनिटे 
- रसायनशास्त्र : 45 प्रश्‍न : 60 मिनिटे 
- भौतिकशास्त्र : 45 प्रश्‍न : 60 मिनिटे (आणि उर्वरित वेळ) 

* परीक्षेला जाण्यापूर्वीच्या टिप्स : 
- प्रवेश पत्र (ऍडमिट कार्ड), स्वत:ची पासपोर्ट आकारातील दोन छायाचित्रे असावीत. 
- विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 7.30 पूर्वी पोचणे आवश्‍यक 

- देशभरातील 95 हजार जागांसाठी "नीट' : एमबीबीएस : 65,000 आणि बीडीएस : 30,000 
- राज्यात एमबीबीएसच्या जागा : सरकारी महाविद्यालये : 2,950, खासगी महाविद्यालये : 1,600 अभिमत विद्यापीठे : 1,200 
- राज्यात बीडीएसच्या जागा : सरकारी महाविद्यालये : 200 आणि खासगी महाविद्यालये : 200 

नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जीवशास्त्राचा पेपर सोडविणे अपेक्षित आहे. हा पेपर जवळपास 45 ते 50 मिनिटांत सोडविल्यास उर्वरित वेळ रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सोडविण्यासाठी देता येईल. भौतिकशास्त्राचा पेपर सोडविण्यापूर्वी तो एकदा वाचून घ्यावा आणि मग सोडवावा. प्रश्‍नपत्रिकेतील 100 टक्के जमणारे प्रश्‍न सुरवातीला सोडवून घ्यावेत. त्यानंतर इतर प्रश्‍नांसाठी वेळ द्यावा. 
- संदीप देवधर, संचालक, देवधर क्‍लासेस 

परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची मनस्थिती कशी आहे, याचा परीक्षेतील यशात मोठा वाटा असतो. परीक्षेदरम्यान शांत आणि संतुलित राहणे आवश्‍यक आहे. पेपर सोडविताना वेळेचे व्यवस्थापन करण्याचे योग्य तंत्र वापरावे. प्रश्‍न योग्य क्रमाने कसे सोडवावेत, याचे नियोजन हाही यशातील महत्त्वाचा घटक आहे. 
- डॉ. तुषार देवरस, करिअर सल्लागार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एस्ट्युट करिअर कौन्सेलिंग ऍकॅडमी 

* परीक्षेला जाताना पोशाख काय असावा : 
हलक्‍या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट, कुर्ता, सलवार, ट्राउझर घालावी. शर्टाला मोठी बटणे नसावीत. पीन, बिल्ला, किंवा इतर कोणतेही चिन्ह शर्टवर नसावे. फुले प्राण्यांचा चित्र अथवा मजकूर नसावा. कमी उंचीची सॅंडल असावी. शूजचा वापर येथे करता येणार नाही. रिंग, नोझपीन, चेन, नेकलेस, घड्याळ, गॉगल, बेल्ट, कॅप, पॉकेट याचा वापर करता येणार नाही. 

पट्टी, खोडरबर, कॅल्क्‍युलेटर आणि इतर बाबींसह पेनही बरोबर ठेवता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यास पेन परीक्षा केंद्रावर दिले जाणार आहे. पाणी, खाद्यपदार्थ परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाता येणार नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com