Sukanya Samriddhi Account Scheme : पुणे जिल्ह्यातील २१ हजार मुलींनी उघडले सुकन्या समृद्धी खाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

21 thousand girls of pune district opened Sukanya Samriddhi Account

Sukanya Samriddhi Account Scheme : पुणे जिल्ह्यातील २१ हजार मुलींनी उघडले सुकन्या समृद्धी खाते

पुणे : केंद्र सरकारने मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला अंगणवाड्यांमधील मुलींच्या पालकांकडून खुपच अल्प प्रतिसाद मिळू लागल्याचे दिसून आले आहे.

गेल्या आठ वर्षांच्या कालखंडात अंगणवाड्यांमधील २१ हजार ४३९ मुलींनी या योजनेचे खाते टपाल खाते किंवा विविध बॅंकांमघ्ये सुरु केले आहे. या योजनेचे खाते उघडण्याचे हे प्रमाण केवळ १४.२७ टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ६३४ मुलींनी या योजनेसाठीचे खाते उघडले आहेत.

केंद्र सरकारने ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’ या अभियानांतर्गत २२ जानेवारी २०१५ रोजी ही योजना सुरु केली आहे. यानुसार आता या योजनेला आठ वर्षांहून अधिक काळ लोटून गेला आहे. केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची ही योजना आहे.

दहा वर्षे वयाच्या आतील मुलींना या योजनेंतर्गत खाते उघडता येते आणि वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच, या योजनेचे खाते सुरू झाल्यापासून गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह एकरकमी मिळत असते, अशी या योजनेची तरतूद आहे.

पुणे जिल्ह्यातील पात्र मुलींना हे खाते उघडता यावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतनिहाय खास शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये ही सर्व खाते उघडले गेले आहेत. केंद्र व राज्य सरकारमार्फत बॅंका आणि टपाल खात्याद्वारे गुंतवणुकीच्या व बचत ठेवींच्या बऱ्याच योजना राबविण्यात येतात.

त्यापैकीच ही एक योजना आहे. या योजनेद्वारे योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व मुलींचे खाते हे टपाल खात्यात (पोस्ट आॅफीस) किंवा अन्य राष्ट्रीयकृत बॅंकेत आपापल्या मुलींचे खाते उघडून, या खात्यात दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकतात. या योजनेंतर्गत वर्षाला किमान २५० रुपयांपासून कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची आर्थिक गुंतवणूक करू शकतात.

- पुणे जिल्ह्यातील एकूण अंगणवाडी प्रकल्प --- २१

- सर्व प्रकल्पांतर्गत येत असलेल्या अंगणवाड्या --- ४६६९

- ही खाते उघडण्यासाठी आयोजित शिबिरांची संख्या --- ७८४

- अंगणवाडीतील मुलींची संख्या --- १ लाख ५० हजार २३९

- सुकन्या समृद्धी योजनेचे उघडलेले खाते --- २१ हजार ४३९

‘सुकन्या समृद्धी’ साठी आवश्‍यक कागदपत्रे

- सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म

- मुलीचा जन्म दाखला

- पॅनकार्ड

- आधारकार्ड

- मतदार ओळखपत्र

- रेशनकार्ड किंवा वीजबिल

‘सुकन्या समृद्धी’च्या खात्यांची संख्या

आंबेगाव --- २७०५

बारामती --- १५५०

भोर --- ५९३

दौंड --- १०६

हवेली --- ४०२९

इंदापूर --- ५३२

जुन्नर --- ४६३४

खेड --- २१३८

पुरंदर --- ३४६

मावळ --- ११३२

मुळशी --- ६५०

शिरूर --- २७११

वेल्हे --- ३१३

एकूण --- २१४३९