खडकवासला धरण अकरा वेळेस भरेल इतके पाणी साेडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा मुठा नदीत तब्बल 22.34 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. पुणे शहराची तब्बल दीड वर्षांची तहान भागू शकते इतके हे पाणी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मुठा नदीतून तब्बल अकरा खडकवासला धरणात साठेल इतके पाणी सोडून देण्यात आले आहे. 

पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा मुठा नदीत तब्बल 22.34 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. पुणे शहराची तब्बल दीड वर्षांची तहान भागू शकते इतके हे पाणी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मुठा नदीतून तब्बल अकरा खडकवासला धरणात साठेल इतके पाणी सोडून देण्यात आले आहे. 

दरम्यान, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा जोरदार पाऊस झाला. सध्या चारही धरणे भरली आहेत. खडकवासला धरण साखळीतील टेमघरला शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत 123, वरसगाव 65, पानशेत 66 आणि खडकवासला येथे 6 मिलिमीटर पाऊस झाला. तर शनिवारी सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला 3 पानशेत 22, वरसगाव 21 आणि टेमघरला 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. टेमघरमधून 2576, वरसगाव 6,079, पानशेत 4658 क्सुसेकने पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सध्या 22,880 क्युसेकने पाणी मुठा नदीत येत आहे.

या पावसाळ्यात मुठा नदीमध्ये चारही धरणातील तब्बल 22.34 टीएमसी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. खडकवासला धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता 1.97 टीएमसी आहे. म्हणजे अकराहून अधिक वेळा खडकवासला धरण भरेल इतके हे पाणी आहे. 

सर्व पाणी पुढे उजनी धरणात जमा होते. याचाच अर्थ उजनी धरणाच्या क्षमतेच्या 16 ते 17 टक्के पाणी खडकवासला प्रणालीतून गेले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा सध्या जोर कमी झाला असून, सध्या खडकवासल्यातून 22 हजार 888 क्सुसेकने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला प्रणालीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. चारही धरणांची पाणी साठवणूक क्षमता 33 टीएमसी असून, 29.15 टीएमसी उपयुक्त साठा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 TMC water released from Khadakwasla dam to Mutha river