विकासासाठी अपक्षांना पाठिंबा ः अजित पवार

ajit pawar
ajit pawar

पिंपरी : ""युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शहराच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे विकासाला अग्रक्रम देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत अपक्षांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे,'' असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. 9) स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी पवार शहरात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
पवार म्हणाले, ""विधानसभेची निवडणूक लढविताना काही तडजोडी कराव्या लागतात. त्याचाच एक भाग म्हणून आघाडीने चिंचवडमधून निवडणुकीच्या रिंगणात असणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीमधून निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. शहराच्या विकासासाठी ही तडजोड केली आहे. राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेत येऊ नये. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला पाठबळ देण्यात येणार आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे. त्यांनी या उमेदवारांना पाठिंबा द्यावा. साताऱ्यातील माण, खटाव, खानापूर, कोथरूड या भागांत आघाडीचे उमेदवार रिंगणात नाहीत. त्यांनी युतीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.'' 

""भारतीय जनता पक्षाचे नेते काश्‍मीरमधील 370 कलम रद्द केल्याचा डांगोरा पिटत आहे. आतापर्यंत राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कायदा सुव्यवस्था ढासळत चालली आहे. बेरोजगारीचा प्रश्‍न वाढत आहे. केंद्र सरकारने रद्द केलेल्या कलमाचा त्याच्याशी काय संबंध आहे,'' असा सवाल त्यांनी केला. 

महापालिकेतील भ्रष्टाचार, शहरातील वाढती गुन्हेगारी, असे अनेक प्रश्‍न आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीन पोलिस आयुक्‍तालय झाले असले तरी, शहरात सुधारणा झाली नाही. पवना धरण भरलेले असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाच वर्षांत बंद जलवाहिनीचे काम करता येत नसेल तर तसे सरकारने जाहीर करावे,'' असे ते म्हणाले. 

पाच वर्षे झोपा काढल्या का? 
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सत्तेत आल्यानंतर दहा रुपयांमध्ये जेवण देऊ, एक रुपयांत आरोग्य तपासणी करू, अशा घोषणा केल्या. पाच वर्षांपासून तेच सत्तेत असून, त्यांनी झोपा काढल्या का? सत्तेत असणाऱ्या युती सरकारने पाच वर्षांत धनगर आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नोकरभरती अशी अनेक आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक केली. राज्य सरकारने कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला आहे. भविष्यात बेकारी वाढतच राहिल्यास जगणे कठीण होईल, असे पवार म्हणाले. 

कारण जनतेला सांगा 
गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत ते न देण्याचे कारण काय, हे जनतेला समजायला हवे, असेही पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com