पाच सेकंदात 25 लाखांची लूट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पिंपरी - एलआयसी आणि मॉलमधील रोकड घेऊन चाललेल्या चेकमेट या कंपनीच्या कर्मचाऱ्यावर वार करून अवघ्या पाच सेकंदात 25 लाख 51 हजारांची रोकड लुटून नेली. ही घटना गुरुवारी (ता. 3) दुपारी निगडीच्या यमुनानगरमध्ये घडली. 

पिंपरी - एलआयसी आणि मॉलमधील रोकड घेऊन चाललेल्या चेकमेट या कंपनीच्या कर्मचाऱ्यावर वार करून अवघ्या पाच सेकंदात 25 लाख 51 हजारांची रोकड लुटून नेली. ही घटना गुरुवारी (ता. 3) दुपारी निगडीच्या यमुनानगरमध्ये घडली. 

महेश पाटणे (रा. हडपसर) असे चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. भाऊसाहेब टकले (वय 38, रा. कोथरूड) असे व्हॅन चालकाचे नाव आहे. यमुनानगर येथील एलआयसी कार्यालयात जमा झालेले पैसे घेण्यासाठी चेकमेट या कंपनीची गाडी (एमएच 02 एक्‍सए 4699) कॅशव्हॅन दुपारी पावणे दोनच्या सुमारास आली होती. एलआयसीमधून घेतलेले पैसे कॅश व्हॅनमध्ये ठेवण्यासाठी कर्मचारी चालले होते. त्या वेळी दोन चोरटे दुचाकीवर काही अंतरावर जाऊन थांबले आणि दोन चोरट्यांनी पाटणे यांच्या खांद्याला अडकवलेली पैशाची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पिशवी सोडत नसल्याने त्यांच्या हातावर चाकूने वार करीत त्यांना पिशवी सोडण्यास भाग पाडले. पैशाची पिशवी मिळाल्यावर दोन चोरटे पुढे चाललेल्या चालत्या दुचाकीवर जाऊन बसले आणि ओटास्कीमच्या दिशेने पळून गेले. 

या बाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे, सहायक आयुक्‍त सतीश पाटील, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे, निगडीचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पळसुले, शंकर आवताडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. 

जखमी कर्मचारी महेश पाटणे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या छोटीशी शस्त्रक्रियाही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. लुटीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. याशिवाय इतर ठिकाणचेही सीसी कॅमेराचे फुटेज मिळविण्याचे प्रयत्न पोलिस करीत आहेत. 

माहीतगार व्यक्‍तीचा सहभाग असण्याची शक्‍यता 
एलआयसीची रोकड किती वाजता नेली जाते, याची आरोपींना माहिती होती. याशिवाय घटनेच्या दिवशी कॅशव्हॅन सोबत असलेला बंदूकधारी सुरक्षा रक्षक सुटीवर गेला होता. याची पुरेपूर माहिती असणाऱ्या व्यक्‍तीने चोरट्यांना टीप दिली असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली.

Web Title: 25 lakh loot in five seconds in pimpri