वैयक्तिक घरांसाठी अडीच लाखांचे अनुदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी अथवा घराच्या दुरुस्तीसाठीदेखील अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पीएमआरडीएकडून हद्दीतील 842 गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी अथवा घराच्या दुरुस्तीसाठीदेखील अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पीएमआरडीएकडून हद्दीतील 842 गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

पीएमआरडीएच्या हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) राबविण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना "पीपीपी मॉडेल'द्वारे घरे देण्याची योजना राबविली जात आहे. त्याचबरोबर वैयक्तिक जागेवर घर बांधण्यासाठी किंवा त्या घरांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख व राज्य शासनाकडून एक लाख, असे एकूण अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्याची योजना लागू केली आहे. ही योजना पीएमआरडीएच्या हद्दीत पहिल्यांदाच राबविली जात आहे. तिच्या अंमलबजावणीसाठी पीएमआरडीच्या हद्दीतील 842 गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी एका संस्थेची नियुक्ती केली आहे. दोन महिन्यांत या संस्थेकडून हे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. 

कोणाला मदत मिळणार 
- नवीन 30 चौरस मीटरपर्यंत बांधकामासाठी 
- जुन्या 21 चौरस मीटरपेक्षा कमी नसलेल्या आणि 30 चौरस मीटरपेक्षा        जास्त नसलेल्या घरांच्या विस्तारीकरणासाठी 
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना 
- वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्यांसाठी 
- देशात कुठेही मालकी हक्काचे दुसरे घर नाही त्यांना 
- झोपडपट्टी किंवा झोपडपट्टीबाहेरील परिसरात राहत असलेल्यांना 
- कच्चे किंवा अर्धवट पक्के घरे असलेल्या कुटुंबांना 
- जमीन मालकी हक्काची असणाऱ्यांना 

या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार 
- सातबारा उतारा, पीआर कार्ड, मालमत्ता कर पावती, पट्टा दस्तऐवज,          खरेदीचा करार 
- तहसीलदार कार्यालयाकडून वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वार्षिक              उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र आणि आधार कार्डच्या तीन झेरॉक्‍स प्रति 
- जल, विद्युत व कर पावती 
- पासपोर्ट आकाराचे फोटो 
- प्रतिज्ञापत्र आणि हमीपत्र 

 

Web Title: 2.5 lakhs Grant for individual homes