
प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने ई-रिक्षांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रिक्षा घेणाऱ्या नागरिकास २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
E-Rickshaw : पुणे महापालिकेचे ई-रिक्षाला २५ हजाराचे अनुदान
पुणे - प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने ई-रिक्षांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रिक्षा घेणाऱ्या नागरिकास २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योनजेची लवकरच सविस्तर घोषणा केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
पुणे शहरात सध्या ८७ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रिक्षाचे महत्त्व आहे. पेट्रोलवरील रिक्षामुळे प्रदूषणात भर पडत असल्याने रिक्षाचालकांना सीएनजी कीट बसविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून महापालिकेने २०१२ ते २०१८ या कालावधीत प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला जात होता. सुमारे ३० हजार रिक्षा चालकांनी त्याचा लाभ घेतला होता.
इंधनाच्या खर्चात बचत, प्रदूषण मुक्त वाहनांसाठी इ वाहनांची मागणी वाढली आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या ६०० इ बस आहेत, आणखी ३०० इ बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतूक होणार आहेत. त्यापुढे जाऊन आता महापालिकेने २०२३ पासून इ रिक्षांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन इ रिक्षा घेताना २५ हजाराचे अनुदान महापालिका देईल.
नवीन बांधकामाच्या ठिकाणी पार्किंगमध्ये चार्जिंगची सुविधा निर्माण करणे असे निर्णय घेतले आहेत. शहरातील ३० वाहनतळाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशनची सुविधा निर्माण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पण त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पुणे महापालिकेतर्फे इ वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणे, पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे आता रिक्षांना २५ हजाराचे अनुदान देणे हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.