पोलादपूर घाटातील अपघातानंतरचे 'ते' 26 तास आव्हानात्मक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे : गेल्या महिन्यात पोलादपूर येथील आंबेनळी घाटात 28 जुलै रोजी कोकण कृषी विद्यापीठाच्या 33 कर्मचाऱ्यांचा जो बस अपघात झाला, तो आजपर्यंतचा सर्वांत भयानक अपघात होता. त्या अपघातानंतर मृतदेह काढण्यासाठी तब्बल 26 तास लागले. कातळ डोंगरकडा, पावसामुळे निसरडी झालेली जमीन आणि माती या अडचणींमुळे बचावकार्याची ती मोहीम आमच्या सर्वांसाठी आव्हानात्मक होती, असे अनुभव महाबळेश्वर ऍडव्हेंचर ट्रेकिंग असोसिएशनचे समन्वयक अनिल केळघणे यांनी शनिवारी सांगितले. 

"एम्प्रेस गार्डन मित्र परिवारा'च्या वतीने पोलादपूर येथील आंबेनळी घाटात बस अपघातामध्ये ज्या "महाबळेश्वर ऍडव्हेंचर ट्रेकिंग असोसिएशन'च्या 43 तरुणांनी जिवाची बाजी लावून बचावकार्य केले. त्यांचा रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विजय केळकर, सुरेश पिंगळे, बचावकार्यातील नीलेश बावळेकर, ओंकार नावलीकर, समीर बावळेकर यांच्यासह त्यांचे साथीदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित महिलांनी कृतज्ञता म्हणून राखीपौर्णिमेनिमित्त या मोहिमेतील सर्व तरुणांना बीजगोळे असलेल्या इकोफ्रेंडली राख्या बांधल्या. 

केळघणे म्हणाले,"" आम्ही महाबळेश्‍वरसह सातारा, सांगली येथे दऱ्याखोऱ्यात 2003 पासून बचावकार्य करीत आहोत. सुमारे 50 स्थानिक तरुण बचावकार्य करीत आहोत. एनडीआरएफ, यशदा आणि नाशिकच्या वैनतेय ट्रेकिंग संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतले असून, त्याचा आम्हाला फायदा होत आहे. आतापर्यंत आम्ही 103 मृतदेह काढले असून, 22 जणांना जीवदान दिले आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळत नाही. एनडीआरएफच्या जवानांसोबत आम्ही पोलादपूरची अवघड मोहीम व्यवस्थित पार पाडली.'' या वेळी प्रास्ताविक सुरेश पिंगळे यांनी, तर आभार केतन कवडे यांनी मानले. 

"पोलादपूर अपघातामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्यांचे अभिनंदन करतो. अत्यंत निःस्पृहपणे कुठलीही अपेक्षा न करता, स्वतःचा जीव धोक्‍यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवितात, हे सर्वांत मोठे काम आहे. असोसिएशनच्या ज्या काही समस्या आणि प्रश्‍न असतील, त्या आर्थिक स्वरूपात तसेच सरकारी पातळीवर सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करू. ते आमचे कर्तव्य आहे.'' 

- प्रतापराव पवार, "सकाळ'चे अध्यक्ष 

Web Title: The 26 hours of challenge after the accident in the Poladpur Ghat