परदेशात घेऊन जाणारे २७ टन गोमांस जप्त

गणेश बोरुडे 
सोमवार, 24 डिसेंबर 2018


 

पुणे : पुणे-मुंबई दृतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी शनिवार (ता.२२) आणि रविवारी (ता.२३) सकाळी केलेल्या कारवाईत एक कंटेनर, एक टेम्पोसह एकूण २७ टन जनावरांचे मांस जप्त केले असून, दोन्ही चालकांना वाहन आणि मुद्देमालासह अटक केली आहे.

सोलापूर येथून न्हावा शेवा बंदराकडे  निघालेला अलकुरेश एक्सपोर्टचा(मुळेगाव तांडा, गट नं.६७, हैदराबाद रोड) कंटेनर ( एमएच-४३ इ-६४५८) शनिवारी (ता.२२) सकाळी ६ वाजता उर्से टोलनाक्यावर गस्तीस असलेल्या पोलिसांनी अडविला. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी तपासणी केली असता, त्यात एक्सपोर्ट पॅकींगमध्ये २३ टन जनावराचे मांस आढळून आले. रुपेश हणुमंत गराडे (३२,धामणे,ता.मावळ,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी चालक महंमद अक्रम खान (२४,दुमदूमा, चालकोसा, हजारीबाग,झारखंड) यास अटक केली आहे. रविवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता ३ दिवस पोलिस कोठडी सुनावली.

मिळालेल्या खबरीनुसार, रविवारी (ता.२३) सकाळी उर्से टोलनाक्यावर पोलिस नाईक मनोज गुरव यांनी अशोक लेलॅन्ड टेम्पो (एमएच-१७ बी वाय-९२२) तपासणी केली असता जवळपास ४ ते ५ टन जनावरांचे मांस आढळून आले. याप्रकरणी मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी (२५, रिव्हेन्यू काॅलनी शिवाजीनगर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी चालक समीर हुसेन शेख (३२, शिपाई मोहल्ला, जुन्नर, पुणे) यास अटक केली आहे. दोन्ही वाहनांतील मिळून मांसाची अंदाजे किंमत ६५ लाख तर वाहनांची किंमत ३५ लाख आहे. दोन्ही वाहनांमध्ये पकडलेले मांस हे गोमांस असल्याचा दावा मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, रुपेश गराडे आणि तळेगावातील बजरंग दलाचे कार्यकर्ते संदेश भेगडे यांनी केला आहे. तळेगावच्या पशुवैदयकीय अधिकारी डाॅ.रुपाली दडके यांनी प्राथमिक तपासणी करुन, मांसाचे नमुने पुढील तपासणीसाठी फाॅरेन्सीक लॅबला पाठवण्यात आले आहेत.

Web Title: 27 tonnes of beef carrying in foreign countries seized in Pune