दौंडमधील पाणी योजनांसाठी 28 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

केडगाव - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यामध्ये समावेश झाल्याने दौंड तालुक्‍यातील 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 28 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. 

केडगाव - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यामध्ये समावेश झाल्याने दौंड तालुक्‍यातील 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 28 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. 

दौंड तालुक्‍यातील या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. तालुक्‍यातील मोठ्या गावांचा या योजनेत समावेश झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दौंड तालुक्‍यातील प्रलंबित पाणी योजनांना गती देण्याची मागणी आमदार कुल यांनी वेळोवेळी विधानसभेत; तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या पाणी योजनांसाठी 13 नोव्हेंबर 2017 ला मंत्री लोणीकर यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनात कुल यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चादेखील उपस्थित केली होती. या पाठपुराव्यामुळे मोठा निधी या गावांना मिळणार आहे. चौदा गावांतील सुमारे दीड लाख लोकसंख्येला या पाणी योजनेचा फायदा होणार आहे. 

योजनेत समाविष्ट गावे व कंसात मिळालेला निधी पुढीलप्रमाणे ः केडगाव (5 कोटी 69 लाख), यवत (3 कोटी 81 लाख), वरवंड (3 कोटी 75 लाख), बोरीपार्धी (3 कोटी 30 लाख), भांडगाव (2 कोटी 62 लाख), कडेठाण (1 कोटी 80 लाख), लिंगाळी (1 कोटी 78 लाख), कुरकुंभ (1 कोटी 26 लाख), पडवी (1 कोटी 50 लाख), स्वामी चिंचोली (80 लाख), कौठडी (78 लाख), कासुर्डी (71 लाख), बिरोबावाडी (43 लाख) व हिंगणीबेर्डी ज्योतिबानगर (35 लाख). या 14 गावांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून, त्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे. 

राज्यातील अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजना 2015 पूर्वी मार्गी लागल्या; परंतु त्यानंतर राज्यातील क्षारबाधित गाव व संसद आदर्शग्राम वगळता इतर गावातील पाणीपुरवठा योजनांना सरकारकडून मंजुरी मिळत नव्हती. आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना हा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टप्पा एक व दोनच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्याचा मनोदय सरकारने आखला आहे. राज्यातील एक हजार तीन गावांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे; परंतु तीन हजार ग्रामपंचायती मागणी करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या योजनेचा उपयोग होणार आहे. 
- राहुल कुल, आमदार, दौंड 

Web Title: 28 crore for water schemes in Daund